मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानल्या जाणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळून आला आहे. मागील तीन दिवसांमध्ये येथे तीन रुग्ण आढळून आले आहेत. गुरूवारी एका ३५ वर्षांच्या डॉक्टरला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. या झोपडपट्टीत लाखो लोक राहत असल्याने कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पालिका आणि पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.
मंगळवारी धारावीमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याला सायन रुग्णालयात दाखल केले असता त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी धारावीमध्ये सफाईचे काम करणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगाराला कोरोनाची लागण झाली. त्याच्या वरळी येथील घरातील आणि धारावीतील कामामधील लोकांना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे.
ही प्रकरणे ताजी असतानाच धारावीमधील एका 35 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण धारावीच्या मेन रोडवर राहत असून त्याच्या जवळच्या लोकांच्या चाचण्या केल्या जात असून त्यांना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. या डॉक्टरच्या जवळच्या नातवाईकांचे रिपोर्ट आल्यावर त्यांच्या पैकी कोणाला कोरोनाची लागण झाली आहे का हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :राज्यात कोरोना बाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद; ४२ रुग्णांना घरी सोडले