मुंबई- दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधले जाणार आहे. या रुग्णालयाची इमारत महापालिकेकडून बांधून दिली जाणार आहे. त्याबाबतचा सामंजस्य करार आज महापालिकेत संपन्न झाला.
प्रतिक्रिया देताना विशाखा राऊत आणि आदेश बांदेकर
दादर प्रभादेवी, गोखले रोड येथील जाखादेवी मंदिरालगत प्रसुतीगृह आणि दवाखाना याकरिता, पालिकेचा आरक्षित भूखंड आहे. या भूखंडावर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला सुपरस्पेशालिटीरुग्णालय उभारायचे आहे. या भूखंडावर तळ अधिक आठ मजली इमारत उभारली जाणार आहे. त्यामध्ये खालील तीन मजल्यांवर मुंबई महानगरपालिकेचे प्रसुतीगृह चालणार असून त्यावरील मजले सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला हस्तांतर करण्यात येणार आहेत. याबाबतचा सामंजस्य करार आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संपन्न झाला. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आज स्वप्न पूर्ण झाले:
माझ्या दादर मतदारसंघात सिद्धिविनायक ट्रस्टद्वारे सुपरस्पेशालिटी रुग्णालय व्हावे हे गेले अनेक वर्षांचे स्वप्न होते. ट्रस्टद्वारे महाराष्ट्रात आर्थिक मदत केली जाते. मात्र दादर येथील विभागात ट्रस्टला निधीचा वापर करता येत नव्हता. मी महापौर असताना १ रुपया दराने ट्रस्टला भूखंड दिला होता. मात्र, नंतर हा भूखंड परत घेतला. मात्र, पालिका आयुक्तांनी ट्रस्टला जागा द्यायला मंजुरी दिली. आता पुन्हा नवीन आयुक्त आल्यावर त्यात बदल घडू नयेत म्हणून आज सामंजस्य करार करण्यात आला असे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सांगितले.
ट्रस्टचे स्वतःचे रुग्णालय:
स्वतःच उभे राहिले तर खऱ्या अर्थाने सेवा करता येईल. करारामुळे पुढे ट्रस्टला बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. सिद्धिविनायक मंदिर ज्या प्रभादेवी परिसरात आहे त्यापरिसरात आजपासून एक रुग्णालय उभारायची प्रक्रिया सुरु झाली आहे. आपण विद्यार्थ्यांना, शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलत असतो. मात्र रुग्णाची सेवा करून खरी सेवा करता येत असल्याने ट्रस्टचे स्वतःचे रुग्णालय उभारले जाणार आहे. तसेच आबासाहेब मराठे डायलेसिस सेंटर उभारणार आहोत असे ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी सांगितले.