मुंबई -राज्यभरातील सरकार रुग्णालयातील हजारो नर्सेस मार्चपासून जिवाची बाजी लावत कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. पण याच कोविड योध्याबाबतीत सरकार किती उदासीन आहे हे समोर आले आहे. कारण आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याने मृत झालेल्या राज्यभरातील एकाही सरकारी नर्सेसच्या कुटूंबीयांना अद्यापही 50 लाखांची मदत मिळालेली नाही. निधी नसल्याचे कारण देत विमा देण्यास टाळाटाळ करत शहीद कोरोना योद्धांचा अपमान केला जात आहे, असे म्हणत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने यावर नाराजी व्यक्त केली. तर लवकरात लवकर ही मदत सरकारने द्यावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा यानिमित्ताने दिला आहे.
शोकांतिका! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकाही सरकारी नर्सेसच्या कुटूंबीयांना अजूनही नाही 50 लाखांची मदत - मुंबई शहीद कोरना योद्ध्या बातमी
कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे जगभरात भीतीचे वातावरण असताना नर्सेसनी न घाबरता जीवाची बाजी लावत रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली, तर आजही रुग्णसेवा देत आहेत. सुट्टी न घेता, रुग्णांची संख्या अधिक असतानाही नर्सेस काम करत आहेत. पण या कोरोना योद्ध्यांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे मात्र सरकारचे अजिबात लक्ष नाही, असा आरोप सुमित्रा तोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय, लातूर यांनी केला आहे.
मानधन वाढ, केंद्राप्रमाणे नर्सिंग भत्ता आणि इतर ही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहेच. पण मृत कोरोना नर्सेसच्या कुटुंबाला 50 लाखांच्या विम्याची मदत देण्यासही सरकार उदासीन भूमिका घेत असून ही शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया तोटे यांनी दिली आहे. राज्यभरातील सरकारी रुग्णालयातील अंदाजे 16 टक्के नर्सेस कोरोना बाधित झाले आहेत. तर यात 10 हुन अधिक नर्सेस शहीद झाल्या आहेत. या शहीद नर्सेसच्या कुटूंबाने 50 लाख विमा मिळावा यासाठी अर्ज सादर केले आहेत. पण आजपर्यंत एकाही कुटूंबाला विमा मिळाला नसल्याची माहितीही तोटे यांनी दिली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरणार
निधी नसल्याची वा इतर कारणे देत शहीद नर्सेसच्या कुटुंबाला विम्याच्या लाभापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप परिचारिका संघटनेकडून केला जात आहे. मृत कोरोना योद्ध्यांबाबत सरकारची उदासीनता दिसून येत आहेच. तर दुसरीकडे कार्यरत असलेल्या नर्सेसबाबतही सरकारची भूमिका उदासीनच आहे. कारण कोरोना बाधित नर्सेसनाच कोरोना तापणसी शुल्क द्यावे लागत आहे. तर त्यांना इतरही सोयी उपलब्ध होताना दिसत नाही. अशा अनेक अडचणीना तोंड देत आम्ही रुग्णसेवा मात्र अतिशय चोख देत आहोत. तेव्हा सरकारने ही आता केवळ आमचे तोंडी कौतुक न करता आमचे प्रश्न सोडवावेत. 50 लाखांचा विमा कागदावर न देता प्रत्यक्ष द्यावा, अशी मागणी तोटे यांनी केली आहे. तर येत्या काळात या समस्या दूर झाल्या नाही तर आम्हाला नाइलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा ही त्यांनी दिला आहे.