मुंबई -राज्यात बर्ड फ्लूचा धोका कमी झाला असला तरी जळगावात तब्बल ६५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य इतर पक्षांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र, एक कावळा मृत झाल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.
बर्ड फ्लूमुळे सोमवारी १७ पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी ही संख्या ६६ वर पोहचली आहे. त्यापैकी ६५ कोंबड्या फक्त जळगावात मृत झाल्या आहेत. राज्यात एक कावळा मृत झाला असून मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा संस्थेच्या प्रयोगशाळेत आणि पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, राज्य शासनाने दिली.
मालकांना ३३८ कोटींचे अनुदान -
आतापर्यंत बर्ड फ्लू बाधित क्षेत्रामधून ७,१२,१७२ मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावली. तर २६ लाख ०३ हजार ७२८ अंडी, ७२ लाख ९७४ किलो खाद्य नष्ट केल्याची माहिती, महाराष्ट्र शासनाने दिली आहे. नुकसान झालेल्या पोल्ट्री फार्मच्या मालकांना सुमारे ३३८.१३ कोटींचे अनुदानाचे दिल्याचे शासनाने म्हटले आहे.
अशी घ्या काळजी -
सध्या बर्ड फ्लूचा धोका नाही. मात्र, पोल्ट्री फार्म येथील पक्षी हाताळताना, हातात ग्लोव्हज, नाका- तोडांला पूर्णपणे झाकणार मास्क, दुकानात नियमित व काटेकोरपणे स्वच्छता आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. तसेच जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. अफवा व गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाण्याच्या सूचना राज्य शासनाने केली आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, अशा सूचनाही केल्या आहेत.