मुंबई : मला मंत्रिपदाची आणि खुर्चीची लालसा नाही असे स्पष्ट करतानाच जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे धर्मयुद्ध टाळण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी मुंबईत नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढताना केले. कोणताही निर्णय घ्यायची एक योग्य वेळ असते, आपलं घर आपण का सोडायचं असे बोलतानाच ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्या दिवशी बघू असेही त्या सूचकपणे म्हणाल्या.
कोणताही निर्णय घ्यायची एक योग्य वेळ असते
कोणताही निर्णय घेण्याची एक योग्य वेळ असते. उगाच कोणताही निर्णय घेऊन काय करायचे भावांनो असे म्हणतानाच आज पक्षाचे अलंकार माझ्याकडे नसतील मात्र माझं सौंदर्य तुम्ही आहात असे पंकजा म्हणाल्या. मी मांडलेला संसार मोडून मी जावे असं तुम्हाला वाटतं का. मला एकटीला न्याय नको, तुमच्या सर्वांसह मला न्याय हवा आहे असे पंकजा समर्थकांची समजूत काढताना म्हणाल्या. यावेळी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी समजावले. एकदा म्हणता महाराष्ट्राची वाघीण आली आणि एकदा म्हणता पंख छाटले, पंख आहे की पंजा ते ठरवा एकदा असे त्या म्हणाल्या.
धर्मयुद्धाचे सूचक उदाहरण
कार्यकर्त्यांची समजूत काढताना पंकजा मुंडेंनी महाभारतातील धर्मयुद्धाचे उदाहरण दिले. पांडवांनी धर्मयुद्ध जिंकलं कारण त्यांच्याकडे निती होती. पांडवांनी पाच गावं मागितली होती, तर सुईच्या टोकावर ठेवता येईल एवढीही जमीन देणार नाही असं कौरव म्हणाले. मात्र तेव्हाही त्यांनी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न केला होता. कारण जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचे प्रयत्न करतो. मीही जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत हे धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कौरव आहे की पांडव आहे हे तुम्हाला माहिती आहे. मला धर्मयुद्ध टाळायचं आहे कारण माझे सैनिक धारातिर्थी पडावे असं मला वाटत नाही. त्यामुळे हे धर्मयुद्ध टाळण्यासाठी तुम्ही सर्व माझं ऐका असे त्या समर्थकांना म्हणाल्या.
काळ कधीही थांबत नाही
कौरवांच्या सेनेतील काही लोकही मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कर्णाच्या रथाचा सारथीही त्याच्या विरोधात होता. अशी परिस्थिती येत असते. काळ कधीच थांबत नाही असे पंकजा मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या.
आपलं घर आपण का सोडायचं?
यावेळी बोलताना आपलं घर आपण का सोडायचं असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. आपण हे घर उभं केलं ते आपण का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू असेही त्या सूचकपणे म्हणाल्या. मी कुणालाच भीत नाही, पण मी सर्वांचा आदर करते. माझे संस्कार निर्भय आणि संस्कारीत राजकारणाचे आहे. मी माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा कधीही अनादर केला नाही असेही त्या म्हणाल्या.