मुंबई -महाविकास आघाडीच्या एकामागोमाग एक नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या. ठाकरे सरकारचे दोन मंत्री आतापर्यंत कोठडीत आहेत. दोघांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. डझनभर नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशीचा ससेमिरा लावला आहे. तर, दुसरीकडे भाजपचा एखादा नेता किंवा आमदार टप्प्यात आला की, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जातो. मग ते नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे असोत, चंद्रकांत पाटील असोत वा खुद्द देवेंद्र फडणवीस. एकमेकांना कशात तरी अडकवायचे आणि मजा पाहायची, हाच खेळ मविआ आणि भाजपत अनेक महिने सुरू आहे. त्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. पण या अधिवेशनात आपण टप्प्यात येऊ, अशी भीती फडणवीसांना वाटत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीची सरकार राज्यात अस्तित्वात आल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना अधिकच टार्गेट केले आहे. या पक्षांमधील नेत्यांना देखील फडणवीस यांनी टारगेट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना केंद्रीय यंत्रणेने जेलमध्ये ठेवले आहे. तसेच, शिवसेनेचे प्रमुख नेते यांना देखील केंद्रीय यंत्रणेने रडारवर ठेवले आहे. महाविकास आघाडीचे स्थापनेत प्रमुख वाटा असलेले संजय राऊत यांच्या पत्नीला केंद्रीय यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले होते. तसेच, त्यांच्या निकटवर्तीय लोक देखील केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत.
भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता
महाविकास आघाडीने देखिल जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली असल्याने भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मागील अधिवेशनादरम्यान भाजपचे बारा आमदार निलंबित केले होते. मात्र, त्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन राज्य सरकारच्या निलंबनाच्या आदेशाविरुद्ध तक्रार केली. काही काळ निलंबन करण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली होती. त्या बारा आमदारांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची धुरा असलेले प्रमुख नेते आशिष शेलार यांचा देखील समावेश होता. त्यामुळे, या अधिवेशनात आमदारांनी निलंबन टाळण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे आणि निलंबन होणार असे कोणतेही कृत्य करू नये, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना दिले आहे.