मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणार्या भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे 15 टक्के पाणी कपात ( Water Supply Reduction ) करण्यात आली आहे. हा बिघाड दुरुस्त होईपर्यंत पाणी कपात कायम राहणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीच्या संकट उभे राहिल्याने मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वैतरणा धरणातून 200 एमएलडी पाणी पुरवठा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Municipal Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली.
दुरुस्ती होई पर्यंत पाणीकपात -मुंबईला पाणी पुरवठा करणार्या धरणांमध्ये भातसा हे महत्त्वपूर्ण धरण आहे. या ठिकाणी वीजनिर्मिती केंद्र असून येथे 15 मेगाव्हॅट वीजनिर्मितीही केली जाते. मात्र, या वीजनिर्मिती केंद्रात रविवारी ( दि. 27 फेब्रुवारी ) पाणी शिरल्याचा प्रकार घडला. सुदैवाने यावेळी कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच व्हॉल्व्ह बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, तोपर्यंत वीजनिर्मिती केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने वीजनिर्मिती आणि मुंबईच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. या बिघाडाची व्याप्ती मोठी असल्याने ही दुरुस्ती कधी होईल याची निश्चिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. मुंबईकरांनी पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबाबत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बुधवारी ( दि. 2 मार्च ) स्थायी समितीत याबाबत प्रश्न उपस्थित केला असता बिघाड दुरुस्त होईपर्यंत पाणी कपात कायम राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.