मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा यासाठी सरकारने अनेक निर्बंध लावले आहेत. अनेक व्यवसाय करणाऱ्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मुंबईतील मासळीबाजार ओस पडले आहेत. मासळीची मागणी देखील घटली आहे. मुंबईतून अनेक जिल्ह्यांमध्ये मासे पुरवले जातात. मात्र कोरोनामुळे ही मागणी देखील कमी झाली आहे. परिणामी उपलब्ध असणारी मासेही भरमसाठ किमतीत मिळत आहे. त्यामुळे मांसाहार प्रेमींचा कल आता कोंबडी आणि मटणाकडे वाढू लागला आहे.
वेळेच्या निर्बंधांमुळे परिणाम
मुंबईमध्ये ठाणे टिटवाळा, पालघर, पनवेल आदी जिल्हा आणि तालुक्यांमधून मत्स्यविक्रेते येतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधांमुळे हा व्यवसाय ठप्प झाल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे. सकाळी बंदरावरती मासे खरेदी केल्यानंतर निघेपर्यंत सकाळचे ८ वाजतात. तिथून व्यवसाय ठिकाणी पोहचण्यासाठी 2 तास लागतात. फक्त 1 तासात काय व्यवसाय करणार म्हणून आता ठाणे, डोंबिवली, कल्याण, पालघर, पनवेल या भागातील विक्रेत्यांनी मुंबईकडे पाठ फिरवली असल्याचे मच्छिमार कृती समितीच्या प्रफुल भोइर यांनी सांगितले.
दोन तासामध्ये मासे विकायचे कसे ?
“मुंबईतील ससून डॉक आणि भाऊच्या धक्क्यावरून गेल्या काही महिन्यात माशांची उपलब्धता कमी झाली आहे. यामुळे असलेल्या माशांच्या किमती वाढलेले आहेत. आणि या कोरोना संकटात माशांचे अव्वाच्या सव्वा भाव लोकांना परवडणारे नाहीत. तसेच 2 तासामध्ये काय मासे विकणार, हा प्रश्न आहे. यामुळे सध्या लॉकडाऊन असल्याने मासेविक्रीचा व्यवसायच काही वेळासाठी बंद केला”, असल्याचे मासे विक्रेत्या प्रज्ञा भोईर यांनी सांगितले.
मासळीपेक्षा कोंबडी बरी…
“मासळीच्या किंमती या भयंकर वाढल्यामुळे मासे विकत घेणे बंद केले आहे. त्याऐवजी आम्ही आता चिकन आणि मटण याला पसंती देत आहोत. बाजारात मासे आहेत. मात्र त्यांच्या किमतीही जास्त आहेत. आवक कमी असल्याने व मासे ताजे नसल्यामुळे पैसे वाया जाण्याची देखील भीती आहे”, असे ग्राहक रमेश भिसे यांनी सांगितले. मासे विक्रेत्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. मासे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वेळेची मर्यादा ही मासळी विक्रेत्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. मासे आणणे ते लावणे या प्रक्रियेत लागणाऱ्या वेळतच सकाळचे दहा वाजतात. लगेच काही वेळात पोलीस आम्हाला हटकून लावतात. त्यामुळे सरकारने ही वेळ दुपारी २ पर्यंत वाढवावी, अशी मागणी मासे विक्रेत्या महिलांनी केली.