महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 20, 2021, 4:55 PM IST

Updated : May 20, 2021, 6:20 PM IST

ETV Bharat / city

मुंबईतील नायगाव बीडीडी चाळीतील सर्वेला 24-25 मेपासून सुरुवात

म्हाडाच्या मुंबई मंडळाने नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी या तिन्ही ठिकाणच्या पुनर्विकासासाठी निविदा काढत कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.

बीडीडी चाळ सर्वे
बीडीडी चाळ सर्वे

मुंबई -मुंबईतील नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीचा पुनर्विकास आता अखेर लवकरच मार्गी लागणार आहे. कारण या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी आणि पुनर्विकासातील सर्व अडसर दूर करण्यासाठी आता म्हाडाचे उच्च पदस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे बीडीडी चाळीत जाऊन रहिवाशांशी चर्चा करत त्यांची बाजू समजावून घेत आहेत. परिणामी रहिवाशांचा विरोध आता मावळत असून त्यांनी पात्रता निश्चिती साठीच्या सर्वे आणि स्थलांतरासाठी होकार दिला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात 24 आणि 25 मे रोजी नायगावमध्ये सर्वे होणार असल्याची माहिती म्हसे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. तर लवकरच सर्वे पूर्ण करत येथील रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

नायगाववासियांनी सर्वे पडला होता हाणून

बीडीडी चाळीची प्रचंड दुरवस्था झाली असून या चाळीचा लवकरात लवकर पुनर्विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने अखेर पाच वर्षांपूर्वी ही जबाबदारी म्हाडाला दिली. म्हाडाच्या मुंबई मंडळाने नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी या तिन्ही ठिकाणच्या पुनर्विकासासाठी निविदा काढत कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. नायगाव आणि ना. म. जोशी येथे कंत्राटदाराची नियुक्ती होऊन चार वर्षे झाली पण अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. तर हा प्रकल्प पात्रता निश्चिती प्रक्रियेतच अडकला आहे. नायगावमधील रहिवाशांनी सर्वेला जोरदार विरोध केल्याने मागील चार वर्षांत 42 इमारतींपैकी केवळ 5 इमारतींचाच सर्वे झाला आहे. तर जेव्हा जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी येथे सर्वेला गेले तेव्हा तेव्हा रहिवाशांनी प्रचंड विरोध करत प्रसंगी रस्त्यावर उतरत सर्वे हाणून पाडला. अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेकदा हुसकावून लावले. त्यामुळे पात्रता निश्चितीसाठीचा सर्वे येथे होऊच शकला नाही. पुनर्विकासातील पात्रता निश्चिती हा पहिला आणि मुख्य टप्पा आहे. पण हाच टप्पा रखडल्याने पुनर्विकासही रखडला आहे. दरम्यान ना. म. जोशी मार्ग येथील सर्वे बऱ्यापैकी पुढे गेल्याचे चित्र आहे. तर येथील 250हून अधिक पात्र रहिवासी संक्रमण शिबिरात स्थलांतरीत ही झाले आहेत.

अधिकारीच मैदानात

नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी आणि रहिवाशांना विश्वासात घेत पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हसे आणि त्यांची टीम आता प्रत्यक्ष मैदानात उतरली आहे. रहिवासी सर्वेला आणि म्हाडाला नेमका का विरोध करत आहेत हे जाणून घेत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हसे यांनी नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग चाळीत जाऊन रहिवाशांशी चर्चा केली आहे. यावेळी रहिवाशांचा कुठलाही विरोध पुनर्विकासाला वा म्हाडाला नसल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हसे यांनी सांगितले आहे. रहिवाशांचा विरोध नाही तर त्यांच्यात नाराजी आणि संभ्रम आहे. कारण त्यांच्यापर्यंत पुनर्विकासाची योग्य माहिती पोहोचत नाही. अधिकारी-कर्मचारी रहिवाशांशी सुसंवाद साधत नाहीत. त्यामुळेच रहिवाशी कोणत्याही गोष्टीसाठी पुढे येत नसल्याचे आपल्या बीडीडी साइट व्हिजिटदरम्यान दिसून आल्याचे ही म्हसे यांनी सांगितले आहे. तर आता आपण रहिवाशांशी चर्चा केली असून एकाही रहिवाशांनी विरोध दर्शविला नाही. उलट कामाला लवकर सुरुवात करा, अशी मागणी केली. त्यानुसार येत्या 24 आणि 25 मेला येथे सर्वे करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 42 पैकी 12 इमारतीचा सर्वे करण्यात येणार होता. पण हा सर्वे रखडला. केवळ 5 इमारतीचाच सर्वे झाला. पण आता टप्प्याटप्यात पात्रता निश्चितीचे सर्व काम पूर्ण करत रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करू. त्यानंतर इमारती मोकळ्या करत त्या पाडून नव्या इमारतीच्या, टॉवरच्या कामाला सुरुवात करू असेही म्हसे यांनी सांगितले आहे. दरम्यान या कामात स्थानिक लोकप्रतिनिधीचेही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे 24-25 मेला होणाऱ्या सर्वेला म्हाडाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, ही हजेरी लावणार असल्याचे समजते आहे.

Last Updated : May 20, 2021, 6:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details