मुंबई - हिजाब, हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंग्यांवरील राजकारण आता हिंदुत्वाच्या मुद्दाकडे आले आहे. हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी भाजप, मनसे आणि शिवसेना या राजकीय पक्षाची चढाओढ लागली आहे. त्यामुळे गगनाला भिडलेली महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी आदी विकासाचे मुद्दे दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे धार्मिक मुद्द्यांच्या आहारी किती जायचे याचा विचार सर्व घटकांतील सामान्य नागरिकांनी आतापासूनच करायला हवा. अन्यथा भविष्यात याचे परिणाम सर्व घटकांना सोसावे लागतील, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.
धार्मिक मुद्द्यांमुळे जनता भरडली जातेय -देशात महागाई सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दिवसागणिक वाढणारे इंधनाच्या दरामुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. कोरोनानंतर बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र देशातील महागाई, बेरोजगारी, वाढलेले इंधनाचे दर, खाद्य तेलाच्या किमतीकडे सामान्यांचे दुर्लक्ष करण्यासाठी जातीय, धार्मिक वाद चर्चेला आणले गेले आहेत. महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसचे राजकारण आता हिंदुत्वाच्या दिशेने निघाले आहे. राज ठाकरेंची औरंगाबाद येथे या मुद्द्यावर सभा होणार आहे. मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा पुकार दिल्यानंतर भाजपने शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली असा आरोप करत डिवचले आहे. शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांच्या धार्मिक मुद्द्यांमुळे सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे.
समाजाला घातक वातावरण -हिंदुत्वाच्या मुद्याचे स्वरूप गंभीर झाला आहे. सध्या वितुष्टचे वातावरण निर्माण केले जात आहे. हे समाजाला मोठे घातक आहे. आगामी काळातील भविष्य कसे असेल, हा जगण्याचा मोठा प्रश्न आहे. आज धर्माच्या नावावर जगण्याचा प्रश्न निर्माण केल्याने भविष्यात माणूस म्हणून जगता येईल का.? याबाबत लोकांनी जागृत राहायला हवे. या सगळ्या गोष्टी का अन कशासाठी केल्या जात आहेत, याचा विचार होण्याची गरज आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विरोचन रावते यांनी सांगितले.