मुंबई - भारताची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईत काही तास सतत पाऊस पडल्यावर मुंबईची तुंबई होते. २६ जुलै २००५ ला मुंबईत एक हजार मिलिमीटर पाऊस पडल्याने मुंबई जलमय झाली होती. त्यात १४९३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आजही काही तास सतत पाऊस पडल्यास मुंबईकर २६ जुलैच्या आठवणी जाग्या करतात. आज या घटनेला १६ वर्ष पूर्ण होत आहेत. जलप्रलयाला आज १६ वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, आजही काही तास सतत पाऊस पडल्यास मुंबईत सखल भागात पाणी साचून, मुंबईची तुंबई होत आहे.
मुंबईत जलप्रलय
मुंबईत २६ जुलै २००५ ला १८ तासात ९९४ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मुंबईत जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या जवळपास निम्मा पाऊस काही तासात पडल्याने, मायानगरी मुंबईत महापूर आला होता. मिठी नदीने रौद्र रूप धारण केल्याने, मुंबई जलमय झाली होती. मुंबईकरांची घरे, दुकाने, वाहने पाण्याखाली गेली होती. मिठी नदी किनारच्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहचले होते. मुंबईमधील रस्ते, ट्रेनची वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईत सर्वत्र पाणीच-पाणी असल्याने, मुंबईकरांनी आहे त्याच ठिकाणी राहणे पसंद केले. या जलप्रलयादरम्यान पाण्यात बुडून तब्बल १४९३ मुंबईकरांचा मृत्यू झाला होता. पावसामुळे मुंबई ठप्प झाल्याने ४५० कोटीं रुपयांचे नुकसान झाले होते. १४ हजार घरांमध्ये पाणी शिरल्याने घरामधील सामानाचे नुकसान झाले होते. पाण्यामुळे ५२ लोकल ट्रेन, ४ हजार टॅक्सी, ३७०० रिक्षा, ९०० बेस्टच्या बसेसचेही नुकसान झाले होते.
मुंबईत २६ जुलै २००५ ला १८ तासात ९९४ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मुंबईकर आजही २६ जुलैच्या आठवणी जाग्या करतात. पालिकेने मिठी नदीचे रुंदीकरण, सौंदर्यीकरण, नदी पात्रातील बांधकामे हटवणे ही कामे हातात घेतली होती. त्याबाबत बोलताना मनपाचे विरोधी पक्षनेते रवी राजा हे प्रकल्प हाती घेतले
२६ जुलै २००५ ला मुंबई जलमय झाल्यावर राज्य सरकार आणि पालिकेने मिठी नदीचे रुंदीकरण, सौंदर्यीकरण, नदी पात्रातील बांधकामे हटवणे, मुंबईमधील पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात आणि खाडीत सोडण्यासाठी नाल्यांची रुंदी आणि खोली वाढवणे, पावसाचे पाणी अधिक गतीने समुद्रात सोडता यावे म्हणून, पम्पिंग स्टेशन उभारणे आदी प्रकल्प हाती घेतले होते. यापैकी काही प्रकल्प आजही पूर्ण झालेले नाहीत. यामुळे मुंबईत २६ जुलै २००५ च्या घटनेनंतर आजही सखल भागात पावसाचे पाणी साचत आहे. मुंबईत काही तास सतत पाऊस पडल्यास साचलेले पाणी पाहून मुंबईकर २६ जुलैच्या आठवणी जाग्या करत असतात.
'मिठी नदीचे काम आजही अर्धवट'
मुंबईतील जलप्रलयाचा अभ्यास करताना, मिठी नदीवरील अनधिकृत बांधकामांमुळे नदीचे पात्र छोटे झाल्याने, पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले. मिठी नदीचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. एमएमआरडीए आणि पालिकेला हे काम देण्यात आले. पुढे एमएमआरडीएने या कामातून आपले अंग काढून हे काम पालिकेच्या माथी मारले. आजही मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही.
'६ पम्पिंग स्टेशनचे काम पूर्ण'
मुंबईमध्ये पाऊस पडल्यावर अनेक सखल भागात पाणी साचते. हे साचलेले पाणी गटार आणि नाल्याच्या मार्गाने अधिक गतीने समुद्रात सोडण्यासाठी पालिकेने नाल्यांच्या आऊट लेटजवळ ईर्ला, वरळी, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया, क्लिव्हलँड, गझदरबंध, मोगरा व माहूल या आठ ठिकाणी पंपिंग स्टेशन प्रस्ताावीत करण्यात आली होती. त्यापैकी सहा पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण होऊन सुरू झाली आहेत. हाजी अली पम्पिंग स्टेशनसाठी १०० कोटी, इर्ला पम्पिंग स्टेशनसाठी ९० कोटी, लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशनसाठी १०२ कोटी, क्लिव्हलँड बंदर पम्पिंग स्टेशनसाठी ११६ कोटी, ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनसाठी १२० कोटी, गझदर पंपिंग स्टेशनसाठी १२५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
'ब्रिमस्टोवॅड प्रकल्प अर्धवट'
मुंबईतील पावसाळी पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी व पुरावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने १९९३ मध्ये ब्रिमस्टोवॅड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. २६ जुलै २००५ ला मुंबई जलमय झाल्याने, २००७ पासून याची अंमलबजावणी कारण्यात आली. नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करणे त्यावरील अतिक्रमणे हटवणे आदी कामे यामधून केली जाणार होती. त्यासाठी पालिकेने १२०० कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले होते. आतापर्यंत पालिकेने तीन पट खर्च केला आहे. तरीही अद्याप हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही.
'आपत्कालीन व्यवस्थापन विभाग'
२६ जुलैच्या घटनेनंतर बचाव कार्य व सर्व सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय राखता यावा म्हणून, मुंबई महापालिकेत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली. मुंबईत आग लागणे, घरे, इमारती कोसळणे, समुद्रात नाल्यात वाहून जाणे आदी घटना आपत्कालीन घटना घडल्यावर हा विभाग सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे काम करत असतो. मुंबईत पाणी साचण्याच्या ठिकाणी विशेष करून मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यावर या विभागाकडून समन्वय साधून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी दरवर्षी हलवले जाते. नियोजनात कमी,
'खर्च वाया'
मुंबईत २६ जुलै २००५ ला जलप्रलय झाला होता. या नंतर चितळे समिती नियुक्त करण्यात आली होती. गेल्या १६ वर्षात ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प, पंपिंग स्टेशन, मिठी नदी रुंदीकरण आणि सौंदर्यीकरण आदी प्रकल्प यावर सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतरही १६ वर्षानंतर पाणी तुंबत आहे. याचा अर्थ नियोजनात महापालिका कुठे तरी कमी पडत आहे अशी टीका पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
'...म्हणून पाणी कमी प्रमाणात साचले'
मुंबईत काही तास सतत पाऊस पडल्यास मुंबईत पाणी साचते. मुंबई सात बेटांपासून बनली असल्याने, तिची भौगोलिक रचना पाहता सखल भागात पाणी साचते. आधी सखल भागात पाच फूट पाणी साचत होते. पालिकेने विविध कामे हाती घेतली आहेत. यामुळे ज्या ठिकाणी पाच फूट पाणी दोन ते तीन दिवस साचून राहायचे त्याठिकाणी आता गुडघ्याच्या खाली पाणी साचते. हे पाणीसुद्धा साचू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत पाणी साचणारच नाही, असा कधीही कोणीही दावा केलेला नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.