मुंबई -मुंबईकरांची वर्षभराची तहान अप्पर वैतरणा, मोडक सागर, ( Modak Sagar Dam ) तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या ७ धरणांच्या माध्यमातून भागवली जाते. ही धरणे मुंबई जवळच्या ठाणे, ( Thane ) पालघर, नाशिक जिल्ह्यात आहेत. शंभर ते दीडशे किलोमीटरवर असलेल्या या धरणांमधून मुंबईला रोज ३ हजार ८५० तर वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
अप्पर वैतरणा धरण - नाशिक जिल्हात इगतपुरी तालुक्यातील धडगाव या गावात वैतरणा, ( Vaitrana Dam ) अलगंडी या नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. हे धरण मातीचा भराव, दगडी बांधकाम या पासून बांधण्यात आले आहे. या धरणाची उंची ४६.०२ मीटर तर लांबी ६हजार ७१५.७२ मीटर इतकी आहे. १९७३ साली अप्पर वैतरणा या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. धरणात पाणी साठविण्याची क्षमता ११.७१ टीएमसी म्हणजे ११ हजार ७१० दशलक्ष घनफुट इतकी आहे. अप्पर वैतरणा धरणाला ५ दरवाजे आहेत. इगतपुरी या शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर अप्पर वैतरणा हे धरण आहे. नाशिक शहरापासून ६४ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. मुंबई शहरापासून १५३ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.
मध्य वैतरणा धरण -ठाणे पालघर जिल्ह्यात मोखाडा येथे कोचाळे गावात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन २०१४ मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले. या धरणाचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) मध्य वैतरणा जलाशय असे नामकरण करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट २००९ रोजी केंद्रीय नगरविकास मंत्री डॉ. जयपाल रेड्डी यांच्या हस्ते शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे,( Uddhav Thackeray ) तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांच्या उपस्थितीत भांडूप संकुल येथे भूमिपूजन करण्यात आले होते. सुरूवातीला १२०० कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प केवळ केंद्र सरकार, पर्यावरण खाते यांच्या मंजुरीसाठी ११ वर्षे रखडला होता. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी ११ वर्षे प्रत्यक्ष कामाचा कालावधी, लोखंड, सिमेंटचे वाढलेले दर, वाहतूक खर्च, मजुरी आदी कारणांमुळे या प्रकल्पाचा खर्च १२०० कोटी रूपयांवरून १७०० कोटी रूपयांवर पोहोचला. धरणाच्या निर्मितीवेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जल,सौर असा संकरित ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करण्यास तसेच ४ रुपये ७५ पैसे प्रतियुनिट या दराने पुढील २५ वर्षासाठी वीज खरेदी करार करण्यास ८ फेब्रुवारी २०२१ रोजी मंजूरी प्रदान केली आहे.
भातसा धरण -ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात भातसा, चोरणा नदीच्या संगमावर १९६८ मध्ये भातसा धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या धरणासाठी दगडी बांधकाम करण्यात आले आहे. सुरुवातीला या धरणाचा बांधकाम खर्च १४ कोटी होता. १९८३ मध्ये हा खर्च ८० कोटींवर गेला. १९८० मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले असले तरी दरवाजांची कामे २००५ पर्यंत सुरु होते. १९९४ - ९५ मध्ये धरणाचा खर्च ३५८ कोटींवर गेला. मुंबईला या धरणामधून ५० टक्के म्हणजेच १३५ कोटी लिटर पाणीपुरवठा केला जातो.
हेही वाचा -CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; यंदा गणेशोत्सव, दहीहंडी धुमधडाक्यात
तानसा धरण -ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यात तानसा गावात हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे बांधकाम दगडी असून उंची ४०.५५ मीटर तर लांबी २८३५ मीटर इतकी आहे. तानसा तलावातून मुंबईला दर दिवशी सुमारे ४५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो.