ठाणे -कोरोना संकटाचा समाजातील सर्व घटकांनाच मोठा फटका बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प झाल्याने अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले. या काळात दळणवळणाच्या सेवाही ठप्प करण्यात आल्या होत्या. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलची सेवाही लॉकडाऊनमध्ये ठप्प होती. त्यामुळे नोकरी, व्यवसाय अशा अर्थार्जनाच्या कामासाठी लोकल प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांवर याचे विपरित परिणाम दिसून आले.
असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मोठा फटका
लॉकडाऊननंतर अनलॉकची सुरूवात झाल्यावर लोकलची सेवा काही अंशी सुरू करण्यात आली. मात्र सुरूवातीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यामुळे उपजीविकेसाठी लोकलच्या प्रवासावर अवलंबून असणाऱ्या असंघटीत क्षेत्राली कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसला. घरकाम करणाऱ्या महिला, दूध तसेच भाजीपाला विक्री करणारे शेतकरी व मजूर यांना याची मोठी झळ पोहोचली. या सर्वांना अजूनही लोकल प्रवासाची मुभा मिळालेली नाही. त्यामुळे या सर्वांसमोर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सेवा पुरविणाऱ्या वर्गासह सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.
सर्वांना प्रवासाची मुभा देण्याची मागणी 30 टक्के प्रवाशांनाच लाभ
कोरोना संकटकाळात सुमारे 5 महिने लोकल सेवा बंद असल्याने खासगी क्षेत्रातील छोट्या आस्थापना आणि छोट्या लघु उद्योगांवर याचा परिणाम झाला. कोरोनाच्या पूर्वी मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा, कर्जत मार्गावर ४० लाख प्रवासी लोकल प्रवास करीत होते. यानंतर अनकॉल काळात लोकल सेवा सुरु झाल्यावर मध्यरेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवाशांची संख्या ७० टक्क्याने घटली. प्रवासाची मुभा मिळलेल्या ३० टक्केच प्रवाशांना याचा लाभ झाला. आजही कल्याण रेल्वे जंक्शन मधून ७० हजार प्रवासी लोकलने प्रवास करीत आहेत. लॉकडाऊनपूर्वी ही संख्या अडीच लाखांच्या घरात होती.
कमी थांब्यांमुळे प्रवाशांना आर्थिक झळ कमी थांब्यांमुळे प्रवाशांना आर्थिक झळ
अनलॉकपासून मध्यरेल्वे मार्गावर सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलूंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा आणि अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत या स्थानकावर लोकलला थांबा देण्यात आला होता. मात्र कल्याण ते कसारा या दरम्यान केवळ टिटवाळा, आसनगाव, कसारा या स्थानकावर थांबा दिला होता. यामुळे खर्डी, वाशिंद, आंबिवली, शहाड येथील कर्मचाऱ्यांना रिक्षा किंवा इतर पर्यायी वाहने वापरून लोकल थांब्याचे स्थानक गाठावे लागत होते. त्यामुळे जादा पैसे आणि वेळ वाया जात होता. शिवाय दिव्यांग कर्मचाऱ्यांना हा प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. तसेच, कल्याण ते कर्जत दरम्यान लोकल अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत येथे थांबा दिला होता. यामुळे भिवपुरी, शेलू, वांगणी, उल्हासनगर, विठ्ठलवाडी येथील कर्मचारी वर्गाला लोकल असून देखील वेळेत प्रवास होत नव्हता. यामुळे विविध प्रवासी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर यावर निर्णय घेण्यात आल्याने आता सर्वच स्थानकात लोकल थांबा मिळाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक झळा कमी झाली आहे.
लोकलमध्ये मुभा नसलेल्यांना 5 तास प्रवासाचा जाच लोकलमध्ये मुभा नसलेल्यांना वाहतूक कोंडीचा जाच अनलॉक काळात सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित साधने, कार्यालये, कारखाने सुरू झाल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली. कल्याण, डोंबिवलीतून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ये-जा करणाऱ्यांची संख्याही या काळात वाढली. मात्र यापैकी अनेकांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने रस्ते मार्गानेच त्यांना कामाचे ठिकाण गाठणे अपरिहार्य ठरले. मात्र कल्याण-शीळ रस्त्यावर पडलेले खड्डे, वाढलेला वाहनांचा भार आणि सुरू असलेली विकासकामे यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिवसातील पाच ते सहा तास प्रवासात खर्च करावे लागत आहेत. आठ तासांची नोकरी आणि पाच तासांचा प्रवास अशा वेळापत्रकामुळे कल्याण, डोंबिवलीकर वैतागले असून आता तरी लोकल सुरू करा, अशी मागणी तीव्र होऊ लागली आहे.
घरकाम करणाऱ्या महिलांना थेट आर्थिक मदतीची मागणी घरकाम करणाऱ्या महिलांना थेट आर्थिक मदतीची मागणीधुणीभांडी करणाऱ्या महिलांना केवळ लोकल प्रवासाची मुभा देऊन त्यांचा आर्थिक प्रश्न सुटला नाही. तर त्यांच्या आरोग्यसह विविध समस्या सोडवण्यासाठी सरकारने मदत करण्याची मागणी केली जात आहे. आजही अनेक ठिकाणी कोरोनाच्या भीतीपोटी या महिलांना रोजगार मिळत नसल्याने त्यांनाही फेरीवाल्यांनाप्रमाणेच थेट आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या कविता वारे यांनी ईटीव्ही भारतच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.