मुंबई -फोन टॅपिंग प्रकरणात नुकतेच ईडीने अटक केलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा जामीन अर्ज राऊस अव्हेन्यू न्यायालयाने फेटाळला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील ( NSE ) कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी मंगळवारी सुनावण्यात आली होती. यानंतर पांडे यांच्यावतीनं जामिनासाठी देखील अर्ज दाखल करण्यात आला. आज तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे संजय पांडेच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती सुनेना शर्मा यांनी २९ जुलै रोजी संजय पांडे यांना ईडीची कोठडी सुनावली होती. त्यांची कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा पांडे यांनी जामीनासाठी अर्ज देखील केला होता. त्यावर आज न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाने मंगळवारी पांडे यांना १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.