मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असतानाच पावसाळी आजारांनी मुंबईकरांना हैराण केले आहे. मुंबईत मलेरिया आणि डेंग्यू पसरत असून जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूचे रुग्ण चार पटीहून अधिक वाढले आहेत. जुलै महिन्यात डेंग्यूचे २८ रुग्ण होते तर ऑगस्ट महिन्यात १३२ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तर मलेरियाचे ऑगस्ट मध्ये एकूण ७९० रुग्ण आढळले आहेत.
ऑगस्टमध्ये डेंग्यूचे रुग्ण चार पटीने वाढले, पालिकेचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन - BMC
मुंबईत मलेरिया आणि डेंग्यू पसरत असून जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूचे रुग्ण चार पटीहून अधिक वाढले आहेत. जुलै महिन्यात डेंग्यूचे २८ रुग्ण होते तर ऑगस्ट महिन्यात १३२ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.
![ऑगस्टमध्ये डेंग्यूचे रुग्ण चार पटीने वाढले, पालिकेचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन dengue](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12944994-615-12944994-1630552342968.jpg)
डेंग्यूचे रुग्ण वाढले -
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान आजारांचे प्रमाण वाढते. एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्याचे काम आरोग्य विभाग करत असतानाच पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे २८ रुग्ण होते. मात्र ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन १३२ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात चार पटीहून अधिक वाढ झाली आहे. जुलै महिन्या मलेरियाचे ७८७ रुग्ण आढळून आले, ऑगस्ट महिन्यात ७९० रुग्ण आढळून आले आहेत. गॅस्ट्रोचे जुलै महिन्यात २९४ तर ऑगस्ट महिन्यात २७६, लेप्टोचे जुलैमध्ये ३७ तर ऑगस्टमध्ये ३७, हेपेटायटीसचे जुलैमध्ये ४८ तर ऑगस्टमध्ये ३५, एच १ एन १ चे जुलैमध्ये २१ तर ऑगस्टमध्ये १७ रुग्ण आढळून आले आहेत.
खबरदारी घ्या -
दरम्यान यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. साधारण पाऊस कमी झाला की ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढायला सुरुवात होते. त्यामुळे आता मुंबई महापालिकेसमोर साथीच्या आजारांचे नवीन आव्हान असणार आहे. दरम्यान घरात आणि आजुबाजूच्या परिसरात मलेरिया आणि डेंग्यूचे डास होऊ नये यासाठी नागरिकांनी जागरूक राहून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन पालिकेने केले आहे.