मुंबई - कोरोना विषाणूने सतत आपले रूप बदलले आहे. सध्या कोरोना विषाणूने डेल्टा प्लस हे रूप धारण केले असून त्याचा प्रसार जलद गतीने होतो. आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या ६ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून पालिकेचा आरोग्य विभाग अलर्टवर असल्याची माहिती पालिकेतील आरोग्य विभागाने दिली आहे.
विषाणूमध्ये बदल -
गेल्या वर्षीच्या मार्चपासून भारतात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. तेव्हापासून हा विषाणू सतत आपले रूप बदलत आहे. कोरोना विषाणूने डेल्टा व डेल्टा प्लस असे रूप बदलले आहे. डेल्टा प्लस हा विषाणू अधिक घातक असून त्याचा प्रसार अधिक प्रमाणात होतो. मुंबईत कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या. पहिली लाट यावर्षी फेब्रुवारीदरम्यान तर दुसरी लाट आता ओसरत आहे. त्याच दरम्यान आतापर्यंत ६ जणांना डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण होऊन गेल्याचे समोर आले आहे.
माहिती देताना आरोग्यमंत्री जिनोमिक सिक्वेन्सिंग - मुंबईत आढळून येणाऱ्या कोरोना पोझिटिव्ह रुग्णांपैकी काही सॅम्पल पुण्याच्या एनआयव्ही म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठवले जातात. यामधून विषाणूने आपले रूप बदलले आहे का, नेमक्या कोणत्या विषाणूचा प्रसार होत आहे, किती प्रमाणात हा प्रसार होत आहे याची माहिती जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून समोर येते. पुण्याच्या एनआयव्ही प्रयोग शाळेकडून सँपलचे रिपोर्ट यायला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
डेल्टा प्लसचे ६ रुग्ण -
फेब्रुवारी महिन्यात पाठवण्यात आलेल्या सँपलपैकी एका महिलेला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे जून महिन्यात समोर आले. एप्रिल मे महिन्यात पाठवण्यात आलेल्या सँपलपैकी एका पुरुषाला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ६०० सँपल पाठवण्यात आले होते. त्यापैकी आणखी ४ जणांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६ वर गेली आहे. डेल्टाचे रुग्ण बरे झाले असले तरी त्यांची संख्या वाढल्याने आरोग्य विभाग अलर्ट असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्या -
डेल्टा प्लस व्हेरिएंट तिस-या लाटेसाठी प्रमुख कारण ठरू शकतो, असे मत आरोग्य तज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबईत बाजूच्या शहर आणि जिल्ह्यातील एमएमआर रिजनमधून मोठ्या संख्येने लोक कामानिमित्त येतात. यामुळे डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रसार अधिक तीव्रतेने होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्या मुंबईत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अमेरिकेतून ६ कोटी रुपयांची मशीन विकत घेण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.