ठाणे : डोंबिवली एमआयडीसीतील ( Dombivali MIDC ) एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची १५ जून रोजीच्या मध्यरात्री भंगार चोरट्यांनी निर्घृण हत्या ( Brutal murder ) केली होती. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही ( CCTV ) फुटेजमध्ये कंपनी बाहेर रस्त्यावर एका रिक्षेच्या पाठीमागे वेडिंग जाहिरातीचा बॅनर होता. याच रिक्षावरील बॅनरमुळे पोलिसांनी ८ तासातच हत्येचा छडा लावून आरोपी रिक्षाचालकासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. तर फरार दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. टोनो डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम (रा. सूचकनाका, कल्याण पूर्व) फिरोज इस्माईल खान ( वय ३०, कोळसेवाडी, कल्याण ) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर ग्यानबहादूर गुरूम (६४) असे हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीचा माग -डोंबिवली एमआयडीसीतील विजय पेपर प्राॅडक्ट या बंद कंपनीमध्ये मृत ग्यानबहादूर हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे १५ जून रोजी रात्रपाळी करत असताना कंपनीत चोरीच्या उद्देशाने चोरटे घुसले होते. हे चोरटे चोरी करत असतानाच त्यांना कडवा प्रतिकार केल्याने कंपनी आवारात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात हत्येचा गुन्हा केला. त्यानंतर पोलीस पथकाने तपासात सुरू केला असता कंपनी भागातील सीसीटीव्ही फुटजे तपासणी करून ताब्यात घेतले. यामधील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना कंपनीजवळ मध्यरात्रीच्या वेळेत तीन जण रिक्षेतून आलेले दिसतात. या रिक्षेच्या पाठीमागे एबीपी माझा परिवाराकडून एबीपी वेडिंगच्या जाहिरातीचे बॅनर रिक्षाला लावला होता.
बॅनरवरून रिक्षाचालकाचा शोध घेऊन केली अटक -एबीपी वेडिंगच्या जाहिरातीचा बॅनर असलेल्या रिक्षाचा शोध पोलिसांनी कल्याण, डोंबिवली भागातून घेतला. एका रिक्षेचा मागे तो बॅनर असलेला भाग कापला असल्याचे दिसले. पोलिसांना त्या रिक्षा चालकावर संशय आला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले असता रिक्षा चालकाने आपले नाव टोनो डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या तीन साथीदारांच्या साहाय्याने केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून चोरीचे भांगर विकत घेणाऱ्या फिरोज इस्माईल खान यालाही अटक केली.