मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले काम केल्याने मुंबई महापालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा 20 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. या बोनसमधून मागील वर्षी इन्कम टॅक्सची रक्कम कापल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यावर्षीही अशीच रक्कम कापल्यास कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरणार असल्याने बोनसच्या रक्कमेतून इन्कम टॅक्सची रक्कम कापू नये, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने पालिका आयुक्तांकडे केली आहे.
दि म्युनिसिपल युनियनची पालिका आयुक्तांकडे बोनसमधून इन्कम टॅक्सची रक्कम न कापण्याची मागणी बोनसच्या रक्कमेत वाढ -
मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाचा प्रसार सुरू झाला. तेव्हापासून आरोग्य, अत्यावश्यक सेवा आणि परिवहन सेवा देण्याचे काम मुंबई महापालिका आणि बेस्ट उपक्रम करत आहे. मागील वर्षी कोरोनात केलेल्या कामाची दखल घेऊन बोनसची रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी कामागर संघटना करत होत्या. मात्र, पालिकेचा महसूल घटल्याने मागील वर्षी 500 रुपये वाढवून पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात आला होता. तर बेस्ट कर्मचाऱ्यांना मागील वर्षी 10 हजार 100 रुपये इतका बोनस देण्यात आला.
बोनसमधून इन्कमटॅक्स कापू नका -
मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बोनसच्या रक्कमेतून इन्कमटॅक्सची रक्कम कापण्यात आली होती. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या हाती कमी प्रमाणात बोनसची रक्कम हाती आली होती. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांना आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या रक्कमेत वाढ करून 20 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. मात्र आता या बोनसमधून 1 ते 6 हजार रुपये इन्कमटॅक्सची रक्कम कापली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरणार असल्याने बोनसमधून इन्कमटॅक्सची रक्कम कापू नये, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहून केली आहे.
हेही वाचा -समीर वानखेडे दिल्लीत दाखल; अनुसूचित जाती आयोगासमोर देणार स्पष्टीकरण