मुंबई - प्रार्थना स्थळांवरील अनधिकृत भोंग्या विषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर दक्षिण मुंबईतील मशिदीवरील भोंग्यावर रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत अजान होणार नाही, असा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आलेला आहे. दक्षिण मुंबईतील २६ मशिदीच्या ट्रस्टींची महत्वाची बैठक या निमित्ताने पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आता मुस्लीम धर्मगुरूंनी लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या अजानबाबत मोठा निर्णय घेतला असून, त्यानुसार आता सकाळची अजान लाऊड स्पीकरशिवाय दिली जाणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध सुन्नी बादी मस्जिद मदनपुरा आणि मिनारा मशिदीने निर्णय घेतला आहे. ज्यात तुम्ही सकाळची अजान ऐकू शकता.
दक्षिण मुंबईतील मशिदींवरील पहाटेची अजान भोंग्या शिवाय होणार दक्षिण मुंबईतील पहाटेचे अजान लाऊड स्पीकर शिवाय -मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरावे यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर काल पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी राज्यभरात मुंबईसह पहाटेचे अजान हे लाऊड स्पीकरवर झाले नाही. याबाबत स्वतः राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये ९० ते ९५ टक्के मशिदीमध्ये लाऊडस्पीकरवर अजान झाले नाही किंवा कमी आवाजात झाले असं सांगत त्या मशिदीमधील मौलवींचे आभार सुद्धा मानले होते. या संदर्भामध्ये मुंबईतील विशेष करून दक्षिण मुंबईतील २६ मशिदिंच्या ट्रस्टींची याबाबत बैठक पार पडली व पहाटेचे अजान लाऊड स्पीकरवर करायचं नाही असा एकमतान निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये दक्षिण मुंबईतील, मशिद बंदर, आग्रीपाडा, मदनपुरा, नागपाडा या ठिकाणच्या मशिदींचे ट्रस्टी उपस्थित होते.
कोणाच्या दबावाखाली निर्णय नाही? -रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत मशिदीवरील भोंग्यावरून अजान पठण केलं जाणार नाही. त्याच बरोबर हा निर्णय आम्ही कोणाच्या दबावाखाली घेतला नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे महत्त्वाच असल्याकारणाने त्यानुसार आम्ही हा निर्णय घेत आहोत. तसेच राज्यात देशात सलोख्याचे वातावरण राहावं या कारणास्तव आम्ही एकमताने हा निर्णय घेतला असल्याचे सुद्धा या ट्रस्टींनी सांगितले आहे. मुंबईत ११४० मशिदी आहेत त्यापैकी १३५ मशिदींमध्ये काल सकाळी ५ च्या अगोदर भोंग्यावर अजान झाली. त्यांच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली होती. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अजान लाऊड स्पीकर वर झालं नाही त्या मौलाविंचे सुद्धा त्यांनी आभार मानले. तसेच हा श्रेय वादाचा विषय नाही असे सांगत याचं श्रेय मला नको असंही त्यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा -Loudspeakers On Sai Mandir Shirdi : शिर्डीच्या साई मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद करू नका, मुस्लिम समाजाची पोलिसांकडे मागणी
मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे स्वागत! - मनसे नेते प्रकाश महाजन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच काही ठिकाणी अजूनही अजान लाऊड स्पीकर वर केली जाते. त्याबाबत त्यांनी स्वतः याची तक्रार केली आहे. परंतु बऱ्याचअंशी हा प्रकार कमी झालेला असून याचं मी स्वागत करतो. तसेच ज्या ठिकाणी पहाटेची अजान स्पीकरवरून न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे यांचे मी आभार मानतो असेही त्यांनी सांगितले आहे साईबाबा देवस्थान येथे पहाटेची काकड आरती लाऊड स्पीकर वर झाली नाही. परंतु तिकडच्या मुस्लिम बांधवांनी लाऊड स्पीकरवर अजान झालं नाही तरी चालेल पण साई बाबांची पहाटेची काकड आरती ही लाऊड स्पीकरवर करावी अशी मागणी केली आहे. या गोष्टी बद्दल बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की साईबाबा देवस्थान पूर्वीपासूनच हिंदू-मुस्लीम या दोघांचही श्रद्धास्थान आहे या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिम यांच्यात धार्मिक सलोखा कायम राहील व त्यांच्या निर्णयाचे मला अतिशय आनंद झालेला आहे असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं आहे.