महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

यंदा राज्यात पुरेसा पाणीसाठा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाचा दावा - यंदा राज्यात पुरेसा पाणीसाठा

उन्हाच्या झळा आता अधिक तीव्र झाल्या असल्या तरी यंदा पाण्याचे दुर्भिक्ष जाणवण्याची शक्यता कमी आहे. गतवर्षाच्या तुलनेत अद्यापही राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात अधिकचा पाणीसाठा असल्याची माहिती जलसंधारण विभागाने दिली आहे. राज्यात केवळ ५८ टँकर सुरू असल्याचीही माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा राज्यात पुरेसा पाणीसाठा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाचा दावा
गतवर्षीपेक्षा यंदा राज्यात पुरेसा पाणीसाठा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाचा दावा

By

Published : Apr 23, 2022, 5:27 PM IST

मुंबई -दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईला शेतकरी आणि नागरिकांना सामोरे जावे लागते. यावर्षीही कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. मात्र यंदा गतवर्षीच्या तुलनेत राज्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे यंदा पुरेसा पाणीसाठा असल्याची माहिती जलसंधारण विभागाने दिली आहे.

राज्यातील मोठे पाटबंधारे प्रकल्प -राज्यातील मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांमध्ये गतवर्षी याच दिवशी ५६ पूर्णांक ४७ टक्के पाणीसाठा होता. तो यंदा ६४ पूर्णांक ८८ टक्के इतका आहे. पुणे जिल्ह्यातील ३५ मोठ्या धरणांमध्ये गतवर्षी यादिवशी केवळ ४९ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी तो ७१ टक्के इतका आहे. औरंगाबाद मधील पंचेचाळीस धरणांमध्ये गतवर्षी ७३ टक्के पाणीसाठा होता. तो यंदा ६९ टक्के इतका झाला आहे. नागपूर विभागातील १६ धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे ४६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्‍ध आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती? -राज्यातील २५८ मध्‍यम प्रकल्पांमध्ये गतवर्षी चार हजार 116 दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५८ टक्के पाणीसाठा होता. तो यंदा ६३ टक्के इतका आहे. पुणे विभागातील ५० धरणांमध्ये ११०८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ७४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. गतवर्षी हा ६१ टक्के इतका होता. नागपूर विभागात सर्वात कमी ४२ धरणांमध्ये ३६७ दशलक्ष घनमीटर, ४६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्‍ध आहे. गतवर्षी हा ३५ टक्के इतका होता.

लघु पाटबंधारे प्रकल्पांची स्थिती? -राज्यातील २८८६ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये तीन हजार ९७१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. म्हणजेच ५० टक्के इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी हा ३५ टक्के इतका होता. अमरावती जिल्ह्यातील ४११ धरणांमध्ये ७४८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६० टक्के इतका सर्वाधिक पाणीसाठा आहे तर पुणे विभागातील ६४१ धरणांमध्ये ३९ टक्के इतका पाणीसाठा आहे. जो गतवर्षी २९ टक्के इतका होता.

राज्यातील एकूण ३२६७ धरणांमध्ये ३३ हजार ३६४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. यापैकी २५ हजार ३९५ दशलक्ष घनमीटर हा उपयुक्त पाणीसाठा तर ७ हजार ८०७ दशलक्ष घनमीटर हा मृत पाणीसाठा आहे. राज्यात गतवर्षी याच दिवशी ५३ पूर्णांक २४ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. तो यंदा ६२.५७ टक्के इतका आहे. त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई जाणवणार नाही असा दावा जलसंधारण विभागाने केला आहे.

राज्यातील टँकरची परिस्थिती? -राज्यात अद्यापही तीव्र पाणीटंचाईचे संकट जाणवत नाही. मात्र कोकणात शंभर गावे आणि १८१ वाड्यांना २ शासकीय आणि ३६ खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागातील बारा गावे आणि नऊ वाड्यांना बारा टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवले जात आहे. तर पुणे विभागात एकही टँकर सुरू नाही. दर वर्षी मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई असते मात्र यंदा केवळ नांदेड जिल्ह्यात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अमरावती विभागात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून नागपूर विभागातही एकही टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे एकूण राज्यात ५८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गतवर्षी याच दिवशी ९८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details