मुंबई- मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड ( Costal Road ) प्रकल्पाचे काम ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. कोस्टल रोड नोव्हेंबर, २०२३ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात 'समुद्री पदपथ’ निर्माण होणार आहे. २० मीटर रुंद व ८.५ किलोमीटर लांबीचा हा पदपथ समुद्राला जोडून व कोस्टल रोडलगत बांधला जाणार आहे. मुंबईतील हा सर्वात मोठा समुद्र पदपथ ठरणार आहे. मुंबईकरांना कोस्टल रोड आणि समुद्र यांच्यामधील या पदपथावर फिरताना आनंद लुटता येणार आहे, अशी माहिती ‘सागरी किनारा रस्ता’ प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली आहे.
३.४५ किलोमिटर लांबीचा रस्ता बोगद्यातून जाणार -तब्बल २० मीटर रुंद व ८.५ किलोमीटर लांबीचा हा पदपथ समुद्राला जोडून व कोस्टल रोडलगत बांधला जाणार आहे. श्यामलदास गांधी उड्डाणपूल ( प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’च्या ( वरळी वांद्रे सी-लिंक ) वरळी बाजूपर्यंत १०.५८ किलोमिटर लांबीच्या सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम सध्या वेगात सुरू आहे. ३.४५ किलोमिटर लांबीचा ‘सागरी किनारा रस्ता’ हा बोगद्यातून जाणारा असणार आहे. हा बोगदा श्यामलदास गांधी उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क दरम्यान असणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत नवीन विस्तीर्ण समुद्री पदपथ बांधण्यात येणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत ८.५ किलोमिटर लांबीचा सलग पदपथ बांधण्यात येणार आहे. या विस्तीर्ण पदपथाची रुंदी २० मीटर म्हणजेच सुमारे ६५ फूट एवढी असणार आहे, असे चक्रधर कांडलकर यांनी सांगितले.