महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवाब मलिकांविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार - petition against Nawab Malik

नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. मलिक यांना वानखेडे यांच्यावर आरोप करण्यापासून रोखावे अशी मागणी याचिकेत केली आहे.

नवाब मलिकांविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार
नवाब मलिकांविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार

By

Published : Oct 27, 2021, 7:00 PM IST

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. मलिक यांना वानखेडे यांच्यावर आरोप करण्यापासून रोखावे अशी मागणी याचिकेत केली आहे.

मलिक यांना वानखेडे यांच्यावर आरोप करण्यासाठी मनाई करावी अशी मागणी करणारी याचिका मौलवी कौसर जफर अली सय्यद यांनी अॅड. अशोक सरोगी यांच्यामार्फत दाखल केली आहे. अमली पदार्थ घेणाऱ्यांच्या पुर्नवसनासाठी काम करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मलिक यांनी एनसीबी आणि वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे तपास यंत्रणेचे आणि अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्य सरकार मधील मंत्री अशी विधाने करत असल्यामुळे हे अधिक त्रासदायक आहे. केवळ मनोधैर्य कमी व्हावे याच हेतूने मलिक सोशल मीडियावर सतत वानखेडे यांच्या विरोधात आरोप करत आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

वानखेडे यांनी ड्रग्स पार्टी प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासात धडाडी आणि प्रामाणिकपणा दाखवला आहे. त्यामुळे एनसीबी प्रभावीपणे काम करत आहे असे दिसते. अशा परिस्थितीत मलिक यांनी एनसीबी किंवा अन्य कोणत्याही तपास यंत्रणेविरोधात आणि अधिकाऱ्यांविरोधात काहीही विधान करु नये आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास त्यांना मनाई करावी अशी मागणी करण्यात आली. याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख करण्यात आला.

मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यासाठी नकार दिला. याचिकाकर्त्यांनी हवे असल्यास सुट्टीकालीन न्यायालयात किंवा नियमित न्यायालयात याचिका दाखल करावी असे निर्देश खंडपीठाने दिले. मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात विविध गंभीर आरोप केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details