मुंबई: जागतिक वारसा स्थळ एलिफंटाला ( World Heritage Site Elephanta ) जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. बेलापूर ते एलिफंटा दरम्यान चालणाऱ्या हायस्पीड वॉटर टॅक्सीच्या तिकीट दरात मोठी कपात केली आहे. बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सीचे तिकीट ( Belapur-Elephanta water taxi ticket reduction ) 800 रुपयांवरून 499 रुपयांवर आणले आहे. यामुळे आता सर्वसामान्य पर्यटकांनासुद्धा वॉटर टॅक्सीमधून समुद्र सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
वॉटर टॅक्सी तिकीट दरात 301 रुपयांची कपात -
गेल्या काही महिन्यापूर्वी भाऊचा धक्का ते बेलापूर आणि बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवा सुरु झाली आहे. या सेवेला पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक प्रतिसाद बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील हायस्पीड वॉटर टॅक्सीला मिळत आहे. विशेष म्हणजे शनिवार-रविवार या सुट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वॉटर टॅक्सीतून पर्यटक एलिफंटाला जात आहे. मात्र, हायस्पीड वॉटर टॅक्सीचे भाडे जास्त असल्याने सर्वसामान्य पर्यटकांना हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवेपासून ( High speed water taxi service ) वंचित राहावे लागत होते. मात्र, आता सागरी महामंडळाच्या पुढाकाराने बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचे भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी बेलापूर ते एलिफंटाला दुहेरी फेरीसाठी प्रति प्रवासी 800 रुपये तिकीट भाडे होते. आता हे 499 रुपये करण्यांत आले आहे. म्हणजे आता बेलापूर ते एलिफंटा वॉटर टॅक्सी तिकीट दर 300 रुपये कमी केले आहे.