मुंबई -कोरोनावर केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची लस उद्या मुंबईत येत आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून कांजूर येथे उभारण्यात येणाऱ्या कोल्ड स्टोरेजचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने परेल येथील पालिकेच्या एफ साऊथ कार्यलयात ठेवली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.
लसीकरणाची तयारी
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात कोरोनाविरोधात मुंबईकर लढा देत आहेत. मुंबई महापालिका आणि राज्य सरकराने केलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने कोरोनावरील भारत आणि सिरम या दोन कंपन्यांच्या लसीला मान्यता दिली आहे. लस लवकरच उपलब्ध होणार म्हणून देशात आणि महाराष्ट्रात कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहेत. मास्टर ट्रेनरला ट्रेनिंग देऊन लसीकरणासाठी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत. लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला आहे. त्यानंतर लस कधी येणार याची प्रतीक्षा असताना आज देशभरातील दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भूवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनऊ, चंदीगड आदी १३ ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे.
कांजूर येथील कोल्ड स्टोरेजचे काम अपूर्ण
मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एका वेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे १० लाख लसी साठवता येऊ शकतात, अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता लसीचा साठा हा एफ दक्षिण येथील लस साठवणूक केंद्रात करण्यात येणार असल्याचे गोमारे यांनी सांगितले.
एफ साऊथ येथे काम पूर्ण
मुंबईमधून सवा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंट लाइन वर्कर अशा २ लाख लोकांची नावे कोविन अॅपवर नोंदविण्यात आली आहेत. या दोन लाख लोकांना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. त्याप्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे. लस मोठ्या प्रमाणात आल्यास ती कांजूरमार्ग येथे कोल्ड स्टोरेजमध्ये साठवली जाईल. मात्र लस कमी प्रमाणात आल्यास परेल एफ साऊथ येथे लस साठवली जाईल. पहिली येणारी लस परेल येथे साठवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.