मुंबई - मेट्रो 2 अ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) हे दोन्ही मार्ग मे महिन्यात वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून वेग देण्यात आला आहे. त्यानुसार मागील महिन्यात बंगळुरूमधून मुंबईत दाखल झालेली देशी बनावटीची पहिली मेट्रो गाडी आज पहिल्यांदा मेट्रो ट्रॅकवर चालविण्यात आली. चारकोप मेट्रो डेपोमध्ये मेट्रो गाडीची मिनी ट्रायल रन घेण्यात आली. तर आता लवकरच ट्रायल रन घेत पुढील तीन महिन्यात ही मेट्रो गाडी मुंबईकरांच्या सेवेत दाखल केली जाणार आहे.
लवकरच आणखी 10 गाड्या मुंबईत येणार
मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7चे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान एकीकडे उर्वरित बांधकाम पूर्ण केले जात आहे, तर दुसरीकडे रोलिंग स्टॉकचे अर्थात ट्रॅक, मेट्रो गाड्या, त्यांची चाचणी अशी कामे केली जात आहे. दरम्यान एमएमआरडीएने आत्मनिर्भरतेचा नारा देत यापुढे सर्व मेट्रो गाड्या भारतातच तयार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बंगळुरूतील एका कंपनीला 96 गाड्या तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या 96मधील पहिली गाडी तयार होऊन मुंबईत आली आहे. या गाडीचे अनावरण 29 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आले. दरम्यान मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7साठी आणखी 11 गाड्या लागणार आहेत. या गाड्या महिन्याभरात मुंबईत येण्याची शक्यता आहे.
520 मीटर धावली मेट्रो
देशी बनावटीची पहिली मेट्रो दाखल झाल्यानंतर आता ती सेवेत आणण्याच्या दृष्टीने पुढील कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार 9 फेब्रुवारीला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण करण्यात आले. तर आज मिनी ट्रायल रन घेण्यात आली. कारडेपोमध्ये 520 मीटर मेट्रो धावली. आता या मेट्रोमधून मुंबईकरांना मेपासून प्रवास करता येणार आहे.