मुंबई -अग्निशामक दल (fire brigade) मुंबई महापालिके(BMC)च्या अखत्यारीत येते. या दलातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पालिका रुग्णालयात मोफत सुविधा असतानाही अपोलो क्लिनिक (Apollo Clinic) या खासगी रुग्णालयाकडून केली जात आहे. त्यासाठी प्रति कर्मचारी तपासणीसाठी ३, ६००-३, ९०० रुपये याप्रमाणे ३ वर्षांसाठी २.२२ कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे. या खासगी रुग्णालयाला या आधी पाच वर्षांचे कंत्राट देण्यात आले होते, आता पुन्हा तीन वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे. यामुळे अग्निशामक दलाला पालिका रुग्णालयावर भरोसा नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खासगी रुग्णालयाकडून तपासणी
मुंबई महानगरपालिकेकडून अग्निशामक सेवा पुरवली जाते. त्यासाठी अग्निशामक दलाची स्थापना करण्यात आली आहे. अग्निशामक दल पालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने या दलाच्या कर्मचाऱ्यांवर पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. तसेच उपचार करताना पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे प्राधान्य दिले जाते. असे असताना अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांची खासगी रुगणलायकडून तपासणी केली जात आहे. त्यासाठी २०१६-१७ या वर्षासाठी मे. अपोलो क्लिनिक' या कंत्राटदाराला ४० वर्षे पूर्ण असलेल्या प्रति कर्मचारी ३ हजार रुपये या दराने कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा २०१८ ते २०२० या ३ वर्षांसाठी सुद्धा टेंडर प्रक्रियेत याच कंत्राटदाराला प्रति कर्मचारी ३, ९०० रुपये या दराने काम देण्यात आले. त्यावेळी कंत्राटदाराला प्रति वर्षी ६६ लाख ३० हजार रुपये प्रमाणे ३ वर्षांत १कोटी ९८ लाख ९० हजार रुपये अदा केले.