महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

न्यू ईयर सेलिब्रेशन : मुंबईकरांच्या 'खाण्या-पिण्या'वर एफडीएची करडी नजर - mumbai latest news

न्यू ईयरचे सेलिब्रेशन 'सुरक्षित' पार पडावे, यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) काम करत असते. त्यानुसार ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 15 दिवसच्या विशेष मोहिमेला सुरुवात झाली आहे.

FDA
FDA

By

Published : Dec 24, 2020, 7:24 PM IST

Updated : Dec 24, 2020, 8:30 PM IST

मुंबई - वर्षाचा शेवटचा आठवडा म्हणजे धम्माल, मजा-मस्ती, भटकंतीचा असतो. त्यातही 31 डिसेंबर हा सगळ्यांसाठीच खास असतो. जाणाऱ्या वर्षाला प्रेमाने निरोप देत येणाऱ्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज असतात. या सेलिब्रेशनमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे 'खाणे-पिणे', अर्थात न्यू ईयर सेलिब्रेशनला पार्टी, हॉटेलमध्ये खाणे-पिणे मोठ्या प्रमाणावर होते. अशावेळी हे न्यू ईयरचे सेलिब्रेशन 'सुरक्षित' पार पडावे, यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) काम करत असते. त्यानुसार ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 15 दिवसच्या विशेष मोहिमेला सुरुवात झाली आहे. रस्त्यावरील फूड स्टॉल, चायनीज स्टॉलपासून बार-रेस्टॉरंटपर्यंत तर टू स्टार हॉटेलपासून सेव्हन स्टार हॉटेलपर्यंत सर्वांवर करडी नजर असणार आहे.

भेसळखोर होतात 'सक्रिय'

सणासुदीत अर्थात दसरा-दिवाळीत अन्न पदार्थांमधील भेसळ वाढते. सणासुदीला गोड धोड केले जाते, फराळ तयार केला जातो. त्यामुळे अन्न पदार्थ आणि कच्चा मालात भेसळ होते आणि याच संधीचा फायदा घेत भेसळखोर या काळात सक्रिय होतात. दसरा-दिवाळीत खवा-मावा, मिठाई, तेल, तूप, बेसन, रवा इत्यादी अन्न पदार्थांमध्ये मोठी भेसळ होते. तर ख्रिसमस आणि नववर्षात पुन्हा भेसळखोर सक्रिय होतात. ख्रिसमसला केक आणि चॉकलेटला मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात बेकरीमधील पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. एफडीएच्या कारवाईतून हे वारंवार समोर येते आहे. तर दुसरीकडे 31 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस असतो. मुंबईभर या दिवशी पार्ट्या होतात, हॉटेलमध्ये खाण्या-पिण्यासाठी लोकं जातात. मोठ्या प्रमाणावर यावेळी अन्न पदार्थ विक्री होते. तेव्हा या वाढत्या अन्न पदार्थांची मागणी लक्षात घेत भेसळखोर सक्रिय होतात. तर भेसळयुक्त अन्नपदार्थामुळे विषबाधेसारखे प्रकार होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून ख्रिसमस आणि नववर्षाच्यानिमित्ताने विशेष मोहीम घेतली जाते.

केक, अन्नपदार्थ आणि दारूचे नमुने घेणार

दरवर्षी 15 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान एफडीएकडून विशेष मोहीम राबवली जाते. त्यानुसार यंदा ही या मोहिमेला सुरुवात झाल्याची माहिती शशिकांत केकरे, सह आयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी दिली आहे. बेकरी आणि केकची विक्री करणाऱ्या इतर दुकानांची, चॉकलेटच्या दुकानांची तापणसी सुरू आहे. तर पुढच्या आठवड्यात रेस्टॉरंट-हॉटेलची तपासणी सुरू होईल. 31 डिसेंबरच्या एक-दोन दिवस आधी कारवाईला आणखी वेग देण्यात येईल. त्यानुसार दारूचे आणि अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातील. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान सध्या कोरोनाचा काळ असून सध्या रात्री 11 वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी आहे. तेव्हा यंदा पार्टी आणि सेलिब्रेशनवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये गर्दी असेल की नाही हा ही प्रश्न आहे. पण तरीही आमची कारवाई, नमुने घेणे सुरूच राहणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

लायसन्स होणार रद्द

अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार अन्न पदार्थ विक्री आणि वितरणासाठी एफडीएचा परवाना आणि नोंदणी बंधनकारक आहे. अशी परवाना-नोंदणी नसताना अन्न पदार्थ विक्री करणे गुन्हा ठरतो. तर जिथे अन्न पदार्थ तयार केले जातात, कच्चा माल ठेवला जातो ती जागा स्वच्छ आहे का, पाणी कोणते वापरले जात आहे, कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचे नियम पाळले जातात का, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होते का अशा अनेक बाबी तपासल्या जातात. या तरतूदीचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. परवाना-नोंदणी रद्द करत गुन्हा-खटले दाखल केले जातात. त्यानुसार या मोहिमेअंतर्गत अन्न पदार्थ-मद्य जप्त करण्यात येणार आहे,गरजेनुसार साठा नष्ट करण्यात येणार आहे. तर अन्न पदार्थांचे-मद्याचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठवण्यात येतील. तर दोषीविरोधात परवाना-नोंदणी रद्द करत गुन्हे-खटले दाखल केले जातील, असेही केकरे यांनी सांगितले आहे. तर नववर्षाचे स्वागत करताना काळजी घ्या, सुरक्षित अन्न पदार्थांचे सेवन करा आणि काहीही संशयास्पद वातल्यास त्वरित एफडीएशी संपर्क साधा, असे आवाहनही केकरे यांनी केले आहे.

Last Updated : Dec 24, 2020, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details