मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा निकालासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्यांकनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे, येत्या दोन दिवसांत बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा -सत्तेच्या गुळाच्या ढेपाला चिपकलेले मुंगळे आहेत हे - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सुपूर्द
मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्याकंन करतांना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या बारावीच्या मुल्यांकनाच्या धर्तीवर, तसेच राज्याने इयत्ता दहावीसाठी मुल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज शालेय शिक्षण विभागाकडून बारावीच्या परीक्षांच्या मुल्यमापनाचा धोरणाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बारावीचा परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण जाहीर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.