मुंबई- मुंबईतील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्यात, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानंतर आता मुंबईमधील सर्व शाळांचे नामफलक मराठीत करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू असणार आहे.
शाळांवर मराठी नामफलक -युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील शाळांचे नामफलक मराठीत असावे, अशी मागणी युवासेनेने मुंबईतील शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 5 एप्रिल) महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त सर्व शाळांमध्ये योग्य आकाराचे नामफलक हे मराठी देवनागरी लिपीमध्ये असावेत, असे आदेश दिले आहेत.