मुंबई - दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा भरतो. यावेळीही पार्टीने परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र, बीएमसी आणि पोलिसांनी अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे सांगून हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे केले आहे. दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक येथे जमतात आणि येथून संदेश घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात. मागील दोन वर्ष कोरोनामुळे येथे दसरा मेळावा होऊ शकला नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला येथे शक्तिप्रदर्शन करण्याची मोठी संधी असून, त्यासाठी पालिकेकडून परवानगी न मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
मनसेची उडी -या दोघांचा वाद अद्याप थांबलेला नाही तोच दसरा मेळाव्याच्या या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मनसेचे नेते व सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून "'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे "वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो" असे देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सोबतच आपण राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्कवर सभा घेण्याची विनंती करणार असल्याचे देखील देशपांडे यांनी म्हटले आहे.
'दसरा मेळावा आमचाच' उद्धव ठाकरे -शिवाजी पार्कवरच्या या दसरा मेळाव्यावरून वाद सुरू असताना आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'आमचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होईल. मग परवानगी मिळो अथवा नाही' अशा थेट शब्दात ठणकावून सांगितल. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जमण्यास शिवसैनिकांची थोड्याच दिवसात सुरुवात होईल. त्यामुळे हा जो काही तांत्रिक मांत्रिक भाग आहे तो ते बघून घेतील. पण, आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल."