मुंबई- मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. या लाटेदरम्यान रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली होती. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी ३६ दिवसांवर आला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाल्याने हा कालावधी महिनाभरात वाढून २ हजार २०५ दिवसांच्यावर गेला ( Mumbai Corona ) आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला -मुंबईमध्ये मार्च, २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा आल्या असून त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी १ डिसेंबरला मुंबईमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी २ हजार ७८० दिवस इतका होता. जानेवारीच्या ६ ते ८ तारखेला दिवसाला २० हजार रुग्णांची नोंद झाली. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी घसरून ११ जानेवारीला ३६ दिवसांवर आला होता. कोरोना विषाणूचा प्रसार सध्या आटोक्यात असल्याने दिवसाला २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून २ हजार २०५ दिवस इतका नोंदवण्यात आला आहे.
दादर येथे रुग्ण दुपटीचा कालावधी ४ हजार १३४ दिवस -मुंबईमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी जी नॉर्थ दादर येथे ४ हजार १३४, घाटकोपर एन वॉर्ड येथे ४ हजार १५, दहिसर आर नॉर्थ येथे ३ हजार ९२१, बोरोवळी आर सेंट्रल ३ हजार ५८४, सँडहर्स्ट रोड बी वॉर्ड येथे ३ हजार ५७६, मुलुंड टी वॉर्ड येथे ३ हजार ३०७, कांदिवली आर साऊथ येथे ३ हजार ११६ इतका रुग्ण दुपटीचा कालावधी नोंद झाला आहे. तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी कुलाबा ए विभाग येथे १ हजार १०५, एम वेस्ट चेंबूर येथे १ हजार ६३६, बांद्रा एच वेस्ट येथे १ हजार ६९३, ग्रॅण्ट रोड डी विभाग येथे १ हजार ७०५, कुर्ला एल वॉर्ड येथे १ हजार ७२०, अंधेरी पश्चिम के वेस्ट विभागात १ हजार ७३९ तर अंधेरी पूर्व के ईस्ट येथे १ हजार ८३८ इतका रुग्ण दुपटीचा कालावधी नोंद झाला आहे.