मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढली होती. या कालावधीत रुग्णसंख्या सुमारे ११ हजारांवर गेली होती. ही रुग्णसंख्या आता एक हजारच्या आत आली आहे. दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीच्या कालावधीतही वाढ होत आहे. २२ जून रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० वर होता. मागील १० दिवसांत यामध्ये आणखी वाढ होऊन हा कालावधी ७४४ वर पोहचला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असल्याने, मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले आहे.
'रुग्णसंख्या स्थिर'
मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाला. फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे पालिकेच्या आरोग्यसेवेवर ताण आला होता. खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा भासल्याने, रुग्णांचे हाल झाले. मात्र, प्रभावी उपाययोजनांमुळे पालिकेला या स्थितीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. रोज ८ ते ११ हजारापर्यंत पोहचलेली रुग्णसंख्या आता हजाराच्या खाली नोंद होते आहे. तर, दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढतो आहे. मागील दहा दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी २४ दिवसांनी वाढला आहे. रोजच्या रुग्णसंख्येमध्ये मात्र चढउतार कायम राहिला आहे. मागील काही दिवसांपासून २५ ते ३० हजारांपर्यंत रोज कोरोना चाचण्या केल्या जात असून, साडेपाचशे ते सातशे दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी ७४४ दिवस
११ मार्च २०२० ते २ जुलै २०२१ पर्यंत एकूण ७ लाख २३ हजार ५५५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ६ लाख ९७ हजार १४० रुग्ण बरे झाले आहेत. १५ हजार ४९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८ हजार ५९८ ऍक्टिव्ह रुग्ण असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्के आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ७४४ दिवस इतका आहे. मुंबईत सध्या १४ झोपडपट्ट्या, चाळी आणि ७१ इमारतीमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा भाग सील करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कसा वाढला डबलिंग रेट?
१ जानेवारी २०२१ ला मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३६५ दिवस, तर १ फेब्रुवारी रोजी ५६४ दिवसांवर पोहोचला होता. मात्र, यानंतर दुसर्या लाटेदरम्यान १ मार्च रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी २४४ दिवस आणि नंतर १ एप्रिल रोजी ४९ दिवसांपर्यंत खाली आला होता. मात्र, एप्रिल, मे'मध्ये रुग्णसंख्या पुन्हा नियंत्रणात आली. त्यामुळे १ मे रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ९६ दिवस तर, १ जून रोजी ४५३ दिवसांवर पोहोचला. २ जुलै रोजी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ७४४ दिवसांवर पोहोचला आहे.
'रुग्णसंख्या आटोक्यात'
मुंबईत गेल्यावर्षी ११ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून रुग्णसंख्या वाढत होती. यावर्षी जानेवारीदरम्यान रुग्णसंख्या कमी झाली. जानेवारी फेब्रुवारी दरम्यान केवळ ३३४ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर निर्बंध कमी केल्याने सर्वत्र गर्दी होऊन फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान दिवसाला ११ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात घट होऊन, सध्या ५०० ते ८०० च्या दरम्यान रोज रुग्ण आढळून येत आहेत. दुसऱ्या लाटेदरम्यान मार्चमध्ये ९६ हजार ५९० तर एप्रिलमध्ये एकाच महिन्यात तब्बल २ लाख २९ हजार १७२ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, मे'पासून कोरोना पुन्हा नियंत्रणात यायला सुरुवात झाली. मे महिन्यात मुंबईत ५४ हजार ५५० तर जूनमध्ये केवळ १५ हजार १३६ रुग्ण आढळले आहेत. तसेच, मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर जानेवारीत ९३ टक्के होता. तो एप्रिलमध्ये ८४ टक्के, मे मध्ये ८९ टक्क्यांवर आला होता. मात्र, यामध्ये सुधारणा होऊन जूनअखेर हे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
'पालिका सज्ज'
कोरोना रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवले, क्लोज कॉन्टॅक्टचा तात्काळ शोध घेण्यास सुरुवात केली, लॉकड़ाऊनमध्ये निर्बंधांची कठोर अंमलबजावणी तसेच प्रभावी उपाय़योजनांमुळे रुग्णांवर नियंत्रण आले आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कंबर कसली असून, आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पुरेशा खाटा, ऑक्सिजन, वेंटिलेटर, लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड, नवीन कोविड सेंटरची उभारणी अशा आदी सुविधा उपलब्ध केल्या असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.