मुंबई-मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने 'मिशन झिरो' राबवले आहे. 'चेज द व्हायरस', मिशन झिरो, ट्रेसिंग, ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रिटिंग या '४ टी' चतु:सूत्रीची अंलबजावणी सुरु केली आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत अव्याहतपणे सुरु असलेल्या गृहभेटी, सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची पडताळणी यामुळे मुंबईमधील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०२ दिवस इतका झाल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट २०२० रोजी ९३ दिवस इतका झाला होता. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी काही प्रमाणात कमी होत १४ सप्टेंबर २०२० रोजी ५४ दिवस इतका नोंदविण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावीपणे राबविलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम आणि सातत्याने साधलेली प्रभावी जनजागृती यामुळे या कालावधीत पुन्हा एकदा सकारात्मक वाढ नोंदविण्यात आली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १ ऑक्टोबर रोजी ६६ दिवस, १० ऑक्टोबर रोजी ६९ दिवस आणि आजच्या २१ ऑक्टोबर रोजी १०२ दिवस एवढा नोंदविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान १० दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९ दिवसांवरुन ३१ दिवसांनी वाढून तो १०२ दिवस इतका झाला आहे. महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांपैकी ३ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक आहे. तर या व्यतिरिक्त ११ विभागांमध्ये सदर कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक असणा-या ३ विभागांमध्ये 'जी दक्षिण विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधी हा सर्वाधिक असून तो १७५ दिवस इतका आहे. तर या खालोखाल 'इ' विभागात १६० दिवस, आणि एफ दक्षिण विभागात १५७ दिवस इतका आहे. या ३ विभागांव्यतिरिक्त इतर ११ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. या ११ विभागांमध्ये 'बी' विभागात १३७ दिवस, 'जी उत्तर' विभागात १३६ दिवस आणि 'एम पूर्व' व 'ए' विभागात १३५ दिवस इतका रुग्ण दुपटीचा कालावधी आहे.