महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १३९ दिवसांवर, आयुक्तांनी मानले मुंबईकरांचे आभार - Mumbai Municipal Commissioner

मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नाला यश येत असून, महापालिकेच्या २४ विभागात रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने २१ ऑक्टोबरला शतक गाठले. तर आज मुंबईमधील रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी १३९ दिवस एवढा नोंदविण्यात आला आहे.

Mumbai corona news
कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १३९ दिवसांवर

By

Published : Oct 27, 2020, 10:05 PM IST

मुंबई - मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नाला यश येत असून, महापालिकेच्या २४ विभागात रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने २१ ऑक्टोबरला शतक गाठले. तर आज मुंबईमधील रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी १३९ दिवस एवढा नोंदविण्यात आला आहे. यानिमित्ताने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पुन्हा एकदा सर्व मुंबईकरांचे आभार मानत, लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात 'मिशन झिरो' हे आपले ध्येय असून ते गाठण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महापालिकेला निश्चितपणे मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा २५ ऑगस्ट २०२० रोजी ९३ दिवस इतका झाला होता. तथापि, त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी काही प्रमाणात कमी होत १४ सप्टेंबर २०२० रोजी ५४ दिवस इतका नोंदविण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने केलेली अधिक प्रभावी सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावीपणे राबविलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम आणि सातत्याने साधलेली प्रभावी जनजागृती यामुळे या कालावधीत पुन्हा एकदा सकारात्मक वाढ नोंदविण्यात येऊन सर्व २४ विभागांचा रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी हा १ ऑक्टोबर रोजी ६६ दिवस, १० ऑक्टोबर रोजी ६९ दिवस, २१ ऑक्टोबर रोजी १०२ दिवस, तर आज १३९ दिवस एवढा नोंदविण्यात आला आहे. मात्र, आजच्या आकडेवारीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता महापालिकेच्या सर्व २४ विभागांपैकी सर्व विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १०० दिवसांपेक्षा अधिक नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे २९६ दिवस एवढा कालावधी हा ‘एफ दक्षिण’ विभागाचा असून सर्वात कमी म्हणजे १०५ दिवस एवढा कालावधी हा ‘आर उत्तर’ विभागाचा आहे.

‘एफ दक्षिण’ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी २९६ दिवसांवर

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक म्हणजे २९६ दिवस इतका कालावधी हा ‘एफ उत्तर’ विभागाचा आहे. या खालोखाल ४ विभागांमध्ये १७५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी नोंदविण्यात आला असून, ६ विभागांमध्ये १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी नोंदविण्यात आला आहे. तर ७ विभागांमध्ये १२५ किंवा त्यापेक्षा अधिक दिवस एवढा कालावधी आणि ६ विभागांमध्ये १०० ते १२४ दिवस एवढा कालावधी नोंदविण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details