मुंबई -एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिन करण्यात यावे या मागणीकरिता कर्मचाऱ्यांकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आज या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. मागील सुनावणीत कर्मचाऱ्यांना 11 एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. आज मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची मुदत 22 एप्रिल ( Deadline for ST employees to return work ) केली आहे.
ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई नको. त्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी देण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.
या निकालावर एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी, आम्ही भारतीय आहोत, पाकिस्तानी नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परीवहन मंत्री अनिल परब हे जबाबदार असल्याचे न्यायालयासमोर युक्तिवादादरम्यान सांगितले आहे.