मुंबई - शाळांना सुट्टी असल्याने बच्चे कंपनीला घेऊन देशभरातील पालक मुंबईमधील पर्यटन स्थळाला भेटी देतात. त्याचप्रमाणे राणीबाग ( Rani Baug Mumbai ) आणि भाऊ दाजी लाड म्युझियमलाही भेट देतात. मात्र आठवड्याच्या मध्येच बुधवारी राणीबाग ( Rani Baug ) बंद ठेवली जात असल्याने पर्यटकांना परत फिरावे लागत आहे. यासाठी राणीबाग शाळांना सुट्ट्या असताना सुरु ठेवावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
बुधवारी राणीबाग बंद -मुंबईत भायखळा येथे राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय आहे. सुमारे ५२ एकर जागेवर हे प्राणी संग्रहालय पसरले आहे. यात विविध प्राणी, पक्षी आणि दुर्मिळ झाडे आहेत. प्राणी, पक्षी पाहण्यासाठी बच्चे कंपनीला घेऊन पालक राणीबागेत येतात. त्याच प्रमाणे राज्यातून आणि देशभरातील पर्यटक राणीबागेत येतात. सुट्टीच्या दिवशी राणीबागेत पर्यटकांची गर्दी वाढलेली असते. सध्या उन्हाळ्याची शाळांना सुट्टी आहे, कोरोना कमी झाल्याने राणीबाग खुली करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांची रोज राणीबागेत गर्दी होत आहे. मात्र बुधवारी राणीबाग बंद असल्याने पर्यटकांना पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. निदान शाळेच्या सुट्यांच्या दिवशी तरी राणीबाग सुरु ठेवावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
भाऊ दाजी लाड संग्रहालय ( Bhau Daji Lad Museum )
राणीच्या बागेतले भाऊ दाजी लाड संग्रहालय या वास्तूची निर्मिती 2 मे 1872 मध्ये करण्यात आली होती. यापूर्वी या संग्रहालयाचे नाव व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असे होते. मात्र नंतर या वास्तूचे नामकरण मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ व या संग्रहालयाच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजावणारे डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मुंबईतील हे अतिशय प्राचीन वस्तू संग्रहायल आहे. हे संग्रहालय 154 वर्ष जुने आहे, हे संग्रहालय सुरू झाले, तेव्हा हे संग्रहालय मुंबईतील पहिले व देशातले तिसरे संग्रहालय ठरले.
४३ हजार ७२८ पर्यटकांनी दिली भेट -कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष राणीबाग बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना आटोक्यात आल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे राणीबागेत मुंबईकर - पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष राणीबागेच्या महसूलाला फटका बसला होता. मात्र आता गर्दी वाढत असल्याने महसूलात भर पडते आहे. सध्या मुलांना उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे. त्यामुळे बच्चे कंपनीची राणीबागेत गर्दी वाढली आहे. शनिवारी, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने राणीबाग गजबजून जाते आहे. शनिवारी तब्बल १७, ६१७ लोकांनी राणीबागेला भेट दिली. त्यामुळे ६ लाख ५४ हजार १७५ रुपये इतका महसूल मिळाला. तर रविवारी २६१११ पर्यटकांनी भेट दिल्याने ९,४४,७२५ रुपये उत्पन मिळाले. त्यामुळे या दोन दिवसांत तब्बल ४३ हजार ७२८ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यामुळे १५ लाख ९८ हजार ९०० रुपये इतका महसूल मिळाला.