मुंबई - विक्रोळी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मागील चार वर्षानंतरही रखडले आहे. या पुलाचे बांधकाम मागील चार वर्षानंतरही रखडले आहे. आतापर्यंत फक्त ४० टक्केच काम पूर्ण झाले असताना कंत्राटात मोठा फेरफार करण्यात आला आहे. (Work flyover at Vikhroli) मूळ ४५ कोटी ७७ लाखांचे हे कंत्राट असून काम रखडल्याने अतिरिक्त ४२ कोटी ६७ लाखापर्यंतची वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हे कंत्राट ८८ कोटी ४५ लाखांवर गेले आहे. (Work on the flyover at Vikhroli) त्यामुळे पुलाचा खर्च दुप्पट वाढला आहे. रेल्वेने स्टीलच्या गडर्रचा वापर करण्यात यावा व इतर काही नव्या सूचना केल्याने हे काम रखडले, असे प्रशासनाने स्पष्ट केले. सल्लागाराच्या वाढलेल्या खर्चाबाबत मात्र चौकशी केली जाईल असे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी सांगितले. या पुलाच्या खर्चावरून भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतरही शुक्रवारी स्थायी समितीत बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
२०१८ पासून या पुलाचे काम सुरू -
विक्रोळी रेल्वे फाटकात मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याने फाटक बंद करून उड्डाणपूल उभारण्याची मागणी येथील रहिवासी आणि राजकीय पक्षांनी केली होती. रेल्वे रूळाच्या भागातील काम रेल्वे प्रशासन करणार आहे, तर उर्वरित मुंबई महापालिका करणार आहे. सन २०१८ पासून या पुलाचे काम सुरू झाले असून आतापर्यंत ४० टक्के पूर्ण झाले आहे. पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व पिलरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. २ मे २०१८ ते एक ऑक्टोबर २०२० (पावसाळा वगळून) पर्यंत पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रकल्पात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि कामात झालेल्या फेरफारामुळे अतिरिक्त २४ महिने वाढवून देण्यात आले आहे. नवीन मुदतीनुसार १३ मे २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली आहे.
भाजपचा आक्षेप -
विक्रोळी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. चार वर्षात फक्त ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काम करण्याआधीच फेरफार करण्यात आल्याने या प्रस्तावावर शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपने तीव्र आक्षेप घेतला. भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी या प्रस्तावाला विरोध करीत या पुलाचे काम चार वर्ष का रखडले, शिवाय काम पूर्ण होण्याआधीच फेरफार करणे योग्य नाही या पुलाचे काम पूर्ण कधी होणार, विद्याविहार व नाहूर या पुलांचे काय? असे प्रश्न विचारले. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हे तिन्ही पूल महत्वाचे आहे. विक्रोळी पुलाच्या कामांत सल्लागारासाठी इतकी फेरफार कशासाठी याचा खुलासा करावा अशी मागणीही केली. यावर तांत्रिक अडचणी व स्टीलच्या गर्डरचा वापर करण्याची सूचना रेल्वने उशिरा केल्याने खर्च वाढला असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी स्पष्ट केले. मात्र, सल्लागाराच्या कामांत मोठ्या प्रमाणात झालेल्या फेरफाराबाबत चौकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले.