मुंबई -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सामना मुखपत्रच्या संपादकीय पदी विराजमान झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांवर अग्रलेखातून टीकास्त्र सोडले आहे. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टात नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर शिवसेना नेतृत्वाच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचं दिसत असून त्याचं प्रतिबंब आजच्या सामना अग्रलेखात उमटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांसह केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शिवसेनेत याआधीही अनेक दिग्गज नेत्यांनी बंड केलं होतं. मात्र, यावेळी शिंदे यांनी बंड करत थेट शिवसेना पक्षावरच दावा सांगितला आहे. त्यामुळे हे बंड ऐतिहासिक ठरलं असून शिवसेना कोणाची, ही लढाई आता कायदेशीर पातळीवर लढली जात आहे. शिवसेना नेत्यांकडून बंडखोर आमदारांवर टीका केली जात असली, तरी एकनाथ शिंदे यांचं नाव घेत टोकदार शब्दांत टीका करणं टाळलं जात होतं. मात्र, पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून एकनाथ शिंदे यांच्यावर आतापर्यंतची सर्वात घणाघाती टीका करण्यात आली आहे.
औटघटकेच्या सरकारसाठी 'स्ट्रेचर' व अॅम्ब्युलन्स तयार - 'एकनाथ शिंदे यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी 'स्ट्रेचर' व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो,' अशा शब्दांत शिवसेनेनं शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांविरोधात सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे.
अलिबाबा आणि चाळीस चोर -बंडखोर आमदारांवर शिवसेना नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, ही टीका करताना या आमदारांसाठी परतीचे दरवाजे उघडे असल्याचंही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगितलं जात होतं. मात्र, आता हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचं सांगत शिवसेनेनं बंडखोरांवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.