मुंबई - राज्यातील शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद देण्याच्या नावाखाली 100 कोटी रुपये मागणाऱ्या पाच जणांना मरीन लाईन पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली होती. तर, आज एक जणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, या सर्वांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
न्यायालयीन कोठडीत रवानगी - मंत्री पदाच्या नावाखाली 100 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्यांविरोधात आमदार राहुल कुल यांच्या खाजगी स्वयंसहाय्यकाच्या तक्रारीवरून मरीन लाईन पोलिसांनी 17 जुलै रोजी सापळा रचून चार चौघांना अटक केली. त्यानंतर या चौघांनी 26 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील पाचवा व्यक्ती नंदकिशोर प्रसाद याला सोमवार रोजी अटक करण्यात आल्यानंतर आज या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले - दरम्यान, मंत्रीमंडळात सहभागी होण्यासाठी इच्छूक असलेल्या आमदारांना असे एजेंट किंवा आरोपी फोन करून हेरत आहेत. मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्यांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार राहुल कुल यांना भेटण्यासाठी आले होते. मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यासाठी 100 कोटी मागितल्याचे आरोपींनी कुल यांना सांगितले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदाराची भेट घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळात सहभागासाठी 90 कोटी रुपये मागत असून त्यातील 20 टक्के रक्कम उद्या द्यावे लागतील असे सांगितले. मात्र, पैसे घेण्यासाठी आमदाराने आरोपींना मुंबईच्या ऑबेरॉय हॉटेलमध्ये बोलावले. मुंबई पोलिसांनी ओबेरॉय हॉटेलमध्ये सापळा रचून चौघांना अटक केली. मात्र, यांच्या वकिलांनी वरील सर्व आरोप हे फेटाळून लावले आहेत.