मुंबई - मुंबईकरांनो, जर तुम्ही 26 जानेवारीपासून वांद्रे-वरळी सी लिंकवरून विना फास्टटॅग प्रवास करत असाल तर असा प्रवास करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सी लिंकवर 100 टक्के फास्टटॅगची अंमलबजावणी करण्यासाठी 26 जानेवारीचा मूहुर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली आहे.
उद्या आणि परवा ट्रायल
सी - लिंकवरील सर्व मार्गिकांवर फास्टटॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून उद्या आणि परवा यावर ट्रायल घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अशावेळी जर फास्टटॅग नसेल तर तुमच्याकडुन दुप्पट टोल वसूल केला जाईल. त्यामुळे 26 जानेवारीच्या आत गाडीला फास्टटॅग लावून घ्या असे आवाहन एमएसआरडीसी ने केले आहे.
सर्व 16 मार्गिकांवर फास्ट टॅग प्रणाली
26 जानेवारीपासून सी लिंकवरील सर्व 16 मार्गिका फास्ट टॅगच्या होतील असे वाघमारे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे. सध्या सी लिंकवर 6 (3 जाणाऱ्या-3 येणाऱ्या) मार्गिकेवर फास्टटॅग कार्यान्वित आहे. तर आता 16 ही मार्गिकेवर फास्ट टॅग प्रणाली बसवण्यात आली आहे. उद्या आणि परवा याची ट्रायल घेण्यात येईल. तर 26 पासून सी लिंकवर फास्टटॅग बंधनकारक असेल असेही वाघमारे यांनी सांगितले आहे.
26 जानेवारीपासून फास्टटॅग बंधनकारक
टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी करत कॅशलेस टोल वसुलीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने फास्ट टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल वसुली देशभरात बंधनकारक केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही आता या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. महाराष्ट्रात वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहिल्या टप्प्यात याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यासाठी 26 जानेवारीपासून वांद्रे-वरळी सी लिंकवर फास्टटॅग बंधनकारक असणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा मुहूर्त मात्र पुढे
सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठी 26 जानेवारीचा मूहुर्त एमएसआरडीसीने दिला होता. त्यानुसार सी लिंकवर 26 जानेवारीला फास्ट टॅगची 100 टक्के अंमलबजावणी सुरू होणार हे निश्चित झाले आहे. पण त्याचवेळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठीचा मूहुर्त मात्र चुकला आहे. या मार्गावर 15 फेब्रुवारीपासून 100 टक्के फास्टटॅग कार्यान्वित होईल असे वाघमारे यांनी सांगितले आहे. या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग 4 असून नॅशनल हायवे ऍथॉरीटीने फास्टटॅगची अंमलबजावणी 15 फेब्रुवारीपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 4 सह संपूर्ण मार्गावर 15 फेब्रुवारीपासूनच फास्टटॅगची 100 टक्के अंमलबजावणी सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्यातील उर्वरित टोलनाक्यांवर मार्च पासून फास्ट टॅग बंधनकारक होणार आहे.
हेही वाचा -2020 मध्ये मुंबई लोकल अपघातातील मृतांच्या संख्येत घट