मुंबई -राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 5 सप्टेंबर रोजी 'शिक्षण दिन' निमित्याने शालेय शिक्षण विभागाने 'थँक अ टिचर' हे विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने ऑनलाइन विविध उपक्रम, स्पर्धा घेण्यात येणार आहे.
'थँक अ टिचर' अभियान -
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१ मध्ये 'थँक अ टिचर' अभियान राबविले होते, यावर्षीदेखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी 'थँक अ टिचर' अभियानांतर्गत शिक्षक कार्यगौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह -
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थीदेखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे, यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समूह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने २ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत 'थँक अ टिचर' अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.
विविध उपक्रम, स्पर्धा घेणार -
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याच्या गौरव प्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचे व्हिडिओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यामांवर प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा -महाराष्ट्रात राजकीय काला : दहीहंडी, आगामी सणांवरुन राज्य सरकार-विरोधक संघर्ष पेटणार?