मुंबई -गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. ब्लॉक घेउन ठाणे आणि दिवा स्थानकाच्या दिशेला रूळ जोडण्याचे काम डिसेंबर महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या पीक अवरच्या गर्दीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
रेल्वे प्रवास होणार सुकर
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयूटीपी)मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. आता ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांना २००८साली मंजुरी मिळाली. तरीही निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडला. तर, प्रकल्पांच्या कामांनी मार्च २०२१मध्ये वेग धरला होता. यापैकी ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचा प्रकल्प विविध कारणांनी रखडला. या प्रकल्पातील रुळाचे काम गेल्या एप्रिल महिन्यात पूर्ण होऊन ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार होती. २३ मार्चपासून कोरोनामुळे प्रकल्पाचे काम थांबले. अनलॉकमध्ये या मार्गाच्या कामाला वेग दिला. ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मुंब्रा येथे खाडीवर पूल बसविला आहे. आता दोन्ही दिशेला रुळांची जाेडणी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येत आहे. हा ब्लॉक ४८ किंवा ७२ तासांचा आहे.