मुंबई:महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष (Poltical Crises In Maharashtra) चांगलाच गाजत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि आमदारांचा खुप मोठा जत्था त्यांच्या गटात सामिल झाला. कायदेशीर प्रक्रीया आरोप प्रत्यारोप सुरु असताना भाजपच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात आले. दरम्यान या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर तसेच शिंदेच्या गटबाजी विरुध्द अनेक तक्रारी सर्वोच्च न्यायालयात पोचल्या या वादावर आता घटनापीठात सुनावणी सुरु झाली आहे. यावर निर्णय होण्या पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा सपाटा लावला आहे. यात ठाकरे सरकारने घेतलेले महत्वाचे 12 पेक्षा जास्त निर्णय बदलण्यात आले. त्यांनी शेवटच्या काळात काढलेल्या 400 जी आरची पडताळणी सुरू केली आहे सोबत त्यांनी 538 वेगळे जी आर काढले आहेत. मंत्री मंडळ अस्तित्वात नसताना हे निर्णय वैध आहेत का यावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पंधराशे कोटीची कामे स्थगित: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने ( Shinde Fadnavis Govt ) आघाडी सरकारच्या कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला होता. गेल्या 14 महिन्यातील आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. सुमारे पंधराशे कोटी रुपयांची कामे स्थगित झाली आहेत. तर नव्या सरकारने मात्र 24 दिवसात 538 जीआर काढले आहेत, म्हणजेच दररोज सरासरी 22 जीआर निघत आहेत.
कोणत्या कामांना दिली स्थगिती? : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी एका आदेशाद्वारे एक एप्रिल 2021 पासून ज्या कामांच्या निविदा मागवल्या आहेत, मात्र कार्यादेश दिलेले नाहीत किंवा कार्यादेश देऊनही कामे अद्याप सुरू झाली नाहीत, अशा कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशामुळे गेल्या 14 महिन्यांमध्ये मंजूर झालेल्या अथवा निविदा काढलेल्या कामांना स्थगिती मिळणार असून त्यामुळे आता या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय योजना आदिवासी उपाय योजना विशेष घटक अंतर्गत येणाऱ्या योजना या कामांचा समावेश आहे. सुमारे 700 ते 800 कोटी रुपयांची कामे या माध्यमातून थांबवली गेली आहेत.
नगर विकासच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन नगर विकास मंत्री असताना या विभागाच्या माध्यमातून 941 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र यामधील 245 कोटी रुपयांची कामे ही केवळ बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील होती या कामांना आता स्थगिती देण्यात आली आहे. तर अन्य राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या कामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जलसंपदा विभाग, महसूल आणि वनविभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील बहुसंख्या जीआर काढले गेले आहेत.
कोणत्या विभागाचे किती जीआर: शिंदे सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्वाधिक म्हणजे 73 जीआर काढले आहेत. त्या पाठोपाठ पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे 68, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे 43 , सामान्य प्रशासन आणि विभागाचे 34, जलसंपदा महसूल आणि वनविभाग वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रत्येकी 24 जीआर काढले. ग्रामविकास विभागाचे 22, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे 22 , गृह विभागाचे 20, आदिवासी विभागाचे 19 , मृद आणि जलसंधारण विभागाचे 17 तर सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागाचे 14 आणि सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाचे 12 जीआर काढण्यात आले आहेत.
त्या ४०० जीआरची पडताळणी: आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागाच्या कामांवर केंद्र सरकारच्या माध्यमातुन वाॅच ठेवण्यात येणार असल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यांनंतर आता महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या काळात काढलेले 400 जी आर पण वांद्यात आले आहेत. केवळ आदित्य ठाकरेच्या विभागातील कामावरच नव्हे तर अन्य विभागांच्या कामांचीही पडताळणी सुरू आहे. शेवटच्या दिवसांत त्या सरकारने ४०० जीआर काढले होते. त्याची पडताळणी होणारच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
नवा दिवस, नवा धक्का : शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला शिंदे-फडणवीस सरकार दिवसेंदिवस पाठीशी घालत आहे. अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर सत्ता गमवावी लागलेल्या महाविकास आघाडीला आता नव्या सरकारकडून एकापाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना रखडल्या असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. या दोन पक्षांच्या वादांत निर्णय आणि विकासाचे काय या बद्दल संशय व्यक्त होत आहे.