मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महापालिकेकडून त्याचा प्रसार रोखण्याचे काम केले जात आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम सुरु असून त्याचा रुग्णांवर होणाऱ्या परिणामावर अभ्यास सुरु आहे. युके येथील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या 'कोविशिल्ड' लसीचा रुग्णांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास आजपासून पालिकेच्या केईएम रुग्णालयातून केला जाणार असल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
कोरोनाचा जगभरात प्रसार झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लस शोधण्याचे काम सुरु आहे. युके येथील ऑक्सफर्ड व पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या 'कोवीशिल्ड' लसीचा रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याने चाचणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्रुटी दूर झाल्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या मान्यतेनंतर मुंबईत महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात या लसीचा रुग्णांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जाणार आहे. केईएम रुग्णालयात करण्यात येणाऱ्या चाचण्यांना एथिक समितीची मंजुरी मिळाल्याने आजपासून चाचण्या केल्या जाणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.