मुंबई -कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रोनविषाणूचा ( Omicron in India ) एका रुग्ण डोंबिवलीत आढळून आला आहे. त्यानंतर टांझानिया येथून धारावीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच त्याच्या संपर्कांत आलेल्या 2 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आज येईल अशी माहिती पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर ( Kiran Dighavkar On Omicron ) यांनी दिली.
धारावीवर ओमायक्रॉनचे सावट -
राज्यातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवली येथे आढळला आहे. त्यातच धारावी येथे पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक प्रवासी कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीवर सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले आहे. या व्यक्तीच्या संपर्कांत आलेल्या 2 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्याचा अहवाल आज उशिरा येणार आहे. दरम्यान या व्यक्तीचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंग करता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येत्या 4 ते 5 दिवसात येईल. कोरोनाचा प्रसार सुरु झाला. त्यावेळी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट बनली होती. आता धारावीत ओमायक्रॉन रुग्ण आढळून आल्यास पुन्हा धारावी हॉटस्पॉट बनण्याची शक्यता असल्याने धारावीकरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर धारावीमधील सर्व शौचालये सॅनिटाइझ केली जात असून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी केली जात असल्याची माहिती दिघावकर यांनी दिली.
हाय रिस्क देशातून आले 3760 प्रवासी -
10 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान हाय रिस्क (High risk country) देशातून 3760 प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी 2794 प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 13 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यात 12 पुरुष तर 1 महिला प्रवासी आहे. या पाॅझीटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. या सर्व पोजिटिव्ह प्रवासी रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग तसेच एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.