मुंबई - बुली बाई ॲप प्रकरणांमध्ये ( Bully Bai App Case ) बंगळुरू येथून अटक केलेला विशाल कुमार झा ( Vishal Kumar Jha ) हा सध्या पोलीस कोठडीत आहे. कोविडची लक्षणे जाणवू लागल्याने त्याला सोमवार रोजी उपचारासाठी कलिना येथील एका रुग्णालायात ( Calina Hospital ) दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मुंबई सायबर सेलची कारवाई -
मुंबईमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई पोलिसातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कस्टडीत असलेल्या बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार झा याला देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई सायबर सेलने ( Mumbai Cyber Cell ) त्याला अटक केली होती. त्यानंतर मुंबई सायबर सेलने उत्तराखंडमधून श्वेता सिंग आणि मयंक रावत या दोन आरोपींना विशाल कुमार झा याने दिलेल्या माहितीवरून अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपी मुंबई सायबर सेलच्या कस्टडीत आहे.
24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी -
तक्रारदाराचा नंबर अज्ञात लोकांकडे कसा गेला, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना 10 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वीही न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. तर विशाल कुमार झा याला न्यायालयाने 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.