मुंबई/नागपूर - मुंबईतील तापमानात अचानक घट झाल्याने थंडी वाढली ( Mumbai Cold Wave Increased ) आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत पारा ७ अंशांनी घसरला असून त्यामुळे थंडी अधिक जाणवत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. आज मुंबईतील कुलाबा परिसरात १५ अंश सेल्सिअस तापमान होते. तर सांताक्रूझमध्ये १३.४ अंशांच्या जवळपास होते.
मुंबईत साधारणपणे पार इतका खाली घसरत नाही. मात्र, थंडीत अचानक वाढ झाल्याने लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. गोरेगाव परिसरात थंडीपासून वाचण्यासाठी लोक शेकोटीचा सहारा घेताना दिसत होते. तर मुंबईच्या रस्त्यावरही उबदार कपडे घातलेल्या लोकांची संख्या मोठी होती. हवामान खात्याने सांगितल्यानुसार, मुंबईतील थंडीत अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे निरभ्र आकाश आणि उत्तर भारतात होणारी बर्फवृष्टी. या बर्फवृष्टीमुळे थंड वारे मुंबईच्या दिशेने येत असल्याने गारवा वाढला आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांत पारा फारसा घसरण्याची शक्यता नाही. एक दोन दिवसांत तापमानात केवळ 0.2 अंश सेल्सिअसची घट अपेक्षित आहे. त्यानंतर मुंबईतील हवामान पुर्वपदावर येईल.