महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यभरातील शिक्षक उद्या काळ्या फिती लावून काम करणार - various demands teachers protest

मागील २० महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शासनाकडे ३२ मागण्या करत आहे. महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे, राज्यभरातील शिक्षक उद्या काळ्या फिती लावून काम करत शासनाचा निषेध करणार आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 4, 2021, 10:48 PM IST

मुंबई - मागील २० महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शासनाकडे ३२ मागण्या करत आहे. महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे, राज्यभरातील शिक्षक उद्या काळ्या फिती लावून काम करत शासनाचा निषेध करणार आहे. तसेच, शिक्षकांच्या मागण्यांबाबत जिल्हा, तालुका विभाग, राज्य स्तरांवर शासनाला निवेदने देण्यात येणार आहेत.

हेही वाचा -विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा शिवसेनेबाबत सॉफ्ट कॉर्नर?

३२ मागण्यांचे दिले निवेदन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेने तीव्र आंदोलन टाळले असून शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचे शिक्षक परिषद कार्यकारीणीने निर्णय घेतला आहे. शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे शिक्षक असणारे एकमेव आमदार नागो गाणार यांनी १ जुलै २०२१ ला शासनाला विविध ३२ मागण्यांचे निवेदन दिले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर यांनी ३० जून रोजी शासनाला कळवले असून शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

काय आहेत मागण्या..?

राज्याच्या शिक्षकांच्या काही निवडक मागण्यांमध्ये, जुनी पेंशन योजना लागू करून भविष्य निर्वाह निधी योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, १०, २०, ३० ही आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना लागू करणे, ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला व दुसरा हफ्ता तात्काळ देणे, शिक्षकेत्तरांच्या पद भरतीबाबतचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी, कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विशेष रजा मंजूर करणे, कोरोनामुळे मृत कर्मचार्‍यांच्या वारसदारांना अनुकंपा योजना लागू करणे, अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करणे, कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे, डी.सी.पी.एस. धारकांना पावत्या देण्यात याव्यात, क्रीडा विभाग अनुदानातील भ्रष्टाचार बंद करण्यात यावा, संस्थे अंतर्गत वाद असणारी पदोन्नतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना देणे, आभासी पद्धतीच्या शिक्षण प्रणालीमध्ये एकसुत्रता यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, अशा ३२ प्रलंबित मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्या, अशा मागण्यांचे निवेदन राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर, आमदार गाणार यांनी केले.

घरीच काळ्या फिती लावून करणार निषेध

मुंबईमध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने घरीच काळ्या फिती लावून शिक्षक, शिक्षकेतर निषेध व्यक्त करतील. निकालाच्या कामासाठी जाणारे शिक्षक शाळेत काळ्या फिती लावून काम करतील, त्यांचे फोटो पाठवतील. तसेच, पदाधिकारी, शिक्षण निरीक्षक उत्तर, दक्षिण, पश्चिम विभाग यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.

हेही वाचा -राज्य सरकारकडून लोकशाहीला कुलूप लावण्याचे काम - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details