मुंबई -दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम करण्यासाठी शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात येत आहे. मात्र, शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा नसल्याने अनेक शिक्षकांनी राज्य सरकारविरोधात मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांसमोर एक अनोखे आंदोलन सुरू केले आहे. शिक्षकांनी सेल्फी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. याशिवाय शिक्षकांनी दंड भरून लोकल प्रवास करत शाळा गाठली आहे.
शिक्षकांनी केले सेल्फी आंदोलन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचे राज्य मंडळाने ठरविले. त्याबाबतचे शासन निर्णय व शिक्षण मंडळाचे आदेश शाळांना प्राप्त झाले. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार दहावीचे मूल्यमापन कसे करावे याबाबत राज्यातील शिक्षकांना शिक्षण मंडळाने प्रशिक्षण दिले. त्यानुसार मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे, विद्यार्थ्यांचे निकाल संकलित करून शिक्षकांनी अंतिम निकाल शाळेच्या निकाल समितीकडे सादर करण्यासाठी ११ ते २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे हे मूल्यमापन करण्यासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. मात्र शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा नसल्यामुळे शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शिक्षक संघटनांनी लोकल प्रवासात शिक्षकांना परवानगी द्यावी याबाबद गेल्या 15 दिवसांपासून अनेकदा मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, मध्य व पश्चिम रेल्वे व्यवस्थापक, मुंबई मनपा आयुक्त, मुंबई महापौर यांच्यासोबतच मनपा विरोधीनेते, मुख्य सचिव, एसएससी बोर्ड अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. तरी सुद्धा आतापर्यंत लोकल प्रवासात शिक्षकांना प्रवासासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्याविरोधात आता शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेत सेल्फी आंदोलन केले आहे.