मुंबई - राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात येईपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करू नये, आवाहन मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींमार्फत करण्यात आले आहे.
शाळा सुरू करण्याची घाई नकोच; शिक्षक संघटना निर्णयावर ठाम शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन 15 जून दरम्यान राज्यात ग्रीन झोनमध्ये येणाऱ्या शाळा सुरू करण्याबाबत चर्चा केली. याचप्रमाणे अन्य भागांतील शाळा देखील ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावर राज्यातील मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी 15 जूनपेक्षा राज्यात कोरोनाचे संकट टळेपर्यंत कोणतीही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी केलीय.
शाळा उशिरा भरल्या तरी, अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. मात्र शाळा सुरू होणार असल्याने पालक, शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळांमध्ये मुले एकत्र आल्यानंतर भविष्यातील संसर्ग टाळता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी होत आहे. जूनपासून पावसाळा सुरू होणार असून या काळात अनेक मुलांना सर्दी, खोकल्यासारखे आजार होतात. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते, असे घागस यांनी सांगितले.
मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार धक्कादायक असल्याचे म्हटले. शाळा सुरू करण्याची घाई करून सरकार शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळत आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला. सरकारच्या हट्टापायी शाळा सुरू झाल्यास महास्फोट घडेल, अशी भीती व्यक्त करत सरकारने 15 जूनच्या दरम्यान शाळा सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
शाळा सुरू करण्यापूर्वी कोणत्या भागात कोरोनाच्या संसर्गाचा किती प्रभाव आणि त्यातून काय परिस्थिती निर्माण झालीय, हे पाहाणे महत्वाचे असल्याने राज्यात 15 जूनला सरसकट शाळा सुरू होऊ शकत नाहीत. कोरोनाने अनेक नवे आयाम दिले असल्याने त्यासाठी सर्व नव्याने व्यवस्था बसवावी लागेल. त्यासाठीची पूर्वतयारी केल्या शिवाय शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे यासाठी घाई न करता थोडा वेळ घ्यावा लागेल, असे मतही सामंत यांनी व्यक्त केले.